आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Power Then Separate Telengana Created, BJP Claim

सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र तेलंगणाची तत्काळ निर्मिती करू, भाजपचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीच्या मुद्दय़ावर कॉँग्रेस दुभंगल्याचे स्पष्ट चित्र असताना भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर 24 तासांत स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मिती करू, असा दावा रविवारी केला.

कॉँग्रेस तेलंगणाबाबत गंभीर नाही. स्वतंत्र तेलंगणा राज्याशिवाय कोणतीही गोष्ट मान्य केली जाणार नाही. नवे राज्य न्यायोचित आहे, असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कॉँग्रेस गेल्या 56 वर्षांपासून लोकांची दिशाभूल करत आहे. कॉँग्रेस पक्षर्शेष्ठी तेलंगणा निर्मितीबाबत निर्णय आहे, मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे निर्णय पुढे ढकलण्यास सांगितले आहे. मात्र, या मुद्दय़ावर आणखी वेळ दवडला जाणार नसल्याचे रेड्डींना सांगण्यात आले. निर्णयानंतर आंध्र प्रदेश व कॉँग्रेसवर होणार्‍या दूरगामी परिणामास आपण जबाबदार राहणार नसल्याचे रेड्डींनी आंध्र प्रदेश प्रभारी दिग्विजयसिंह यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रेड्डी यांनी शनिवारी कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व दिग्विजयसिंह यांची भेट घेतली होती. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी सर्मथक आमदारांची बैठक घेऊन चर्चेची माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत निर्णय लांबणीवर टाकण्यास सांगितल्याची माहिती रेड्डींनी सर्मथक आमदारांना दिली.

निवडणुकांची अडचण
ग्रामपंचायत निवडणूक 31 जुलैपर्यंत पूर्ण होणार असून नगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 15 ऑगस्ट रोजी जारी होणार आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात या निवडणुका पूर्ण होणार आहेत. यानंतर लगेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होईल. त्यामुळे तेलंगणाच्या निर्णयामुळे निकालांवर परिणाम होईल, अशी स्थानिक नेत्यांना भीती आहे.


सहा तेलंगणाविरोधी खासदार
केंद्रीय मंत्री एम. एम. पल्लम राजू, के.एस. राव, चिरंजीवी आणि डी. पुरंदरेश्वरी (सर्व आंध्र किनारपट्टी क्षेत्रातील) यांच्यासह के. बापीराजू आणि अनंतकुमारी रेड्डी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेऊन तेलंगणाला विरोध दर्शवला आहे. तेलंगणामुळे आंध्र प्रदेशचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.


त्वरित निर्णय जाहीर करा :राजनाथ
आपला पक्ष स्वतंत्र तेलंगणा निर्मितीच्या बाजूने आहे. त्यामुळे सरकारने त्वरित घोषणा करावी, अशी मागणी भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाजप मागासवर्गीय आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केली. सत्तेवर आल्यास तेलंगणाची निर्मिती करू, असा पुनरुच्चर त्यांनी केला. संपुआने या मुद्दय़ावर 31 जुलै रोजी समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.