आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Session A Bill For Water Ways Nitin Gadkari

जलमार्गासाठी आगामी अधिवेशनात विधेयक - नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील १०१ नद्यांमधून जलमार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगामी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाणार आहे. रस्ते वाहतूक तथा जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी एका विशेष मुलाखतीत ही माहिती दिली.
जलमार्ग हा मालवाहतुकीसाठी सर्वात स्वस्त आणि पर्यावरण पूरक असे साधन ठरेल. जलमार्ग तयार झाल्यानंतर देशातील रस्ते आणि रेल्वे नेटवर्कवरील ताणही काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी म्हणाले, प्रती किलोमीटर ३० पैसे असा मालवाहतुकीचा दर असेल. रेल्वेने हा खर्च एक रूपये आणि रस्ते वाहतुकीत दीड रुपये प्रती किमी मोजावे लागतात. हे स्पष्ट असतानाही जलमार्गाला प्रोत्साहन देण्यात आले नव्हते. चीनमध्ये ४७ टक्के, युरोपमध्ये ४० टक्के मालवाहतुक जलमार्गाने केली जाते. भारतात हे प्रमाण केवळ ३.३ टक्के आहे. त्यातही ३ टक्के किनारपट्टी भागात अशी वाहतूक होते. अंतर्गत पातळीवर हे प्रमाण ०.३ टक्के नगण्य आहे.
त्याचा वापर फार कमी प्रमाणात होतो. अंतर्गत पातळीवर नद्या, तलाव, बॅकवॉटरचा वापर वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो.
केवळ ५ नद्यांत जलमार्ग
आतापर्यंत सरकारने केवळ ५ नद्यांमध्ये जलमार्ग जाहीर केले आहे. ५५ नद्यांमध्ये जलमार्ग सुरू करता येऊ शकेल का, यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत. योग्य ती मंजुरी मिळाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल.

प्रकल्प पीपीपीवर
नद्यांवरील जलमार्गाचे प्रकल्प सुरू करण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी तो एकटे सरकार पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी सरकारी-खासगी भागीदारीने (पीपीपी) हे प्रकल्प पूर्ण केले जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

सध्या देशात फक्त पाचच जलमार्ग
१. गंगा-भागीरथी-हुगळी (अलाहाबाद ते हल्दिया) :
१, ६२० किलो मीटर.
२. ब्रह्मपुत्रा (धुबरी ते सादिया) : ८९१ किमी.
३. वेस्ट कोस्ट कॅनॉल (कोट्टपुरम ते कोल्लम) : २०५ किमी.
४. काकिनाड- पुड्डुचेरी तलाव :
१, ०७८ किमी.
५. इस्ट कोस्ट कॅनॉल : ५८८ किमी.
सर्वात स्वस्त पर्याय
जलमार्ग : ३० पैसे प्रती किमी.
रेल्वे : १ रुपये प्रती किमी.
रस्ते : १.५ रुपये प्रती किमी.
मालवाहतुकीचे प्रमाण
भारत : ३.३ टक्के
चीन : ४७ टक्के
युरोप : ४० टक्के.
१४, ५०० किलोमीटर अंतर्गत जलमार्ग.