नवी दिल्ली - जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करण्यासाठी राहुल गांधी बुधवारी लोकसभेत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन आक्रमक झाले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आडून, तर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर थेट निशाणा साधला. देशात केवळ एका व्यक्तीचे म्हणजे मोदी यांचे म्हणणे ऐकले जाते, लोकसभाध्यक्षांवर पक्षपाती आणि एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभेत प्रश्नोत्तरांचा तास सुरू होताच जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे खासदार अध्यक्षांसमोरील हौद्यात उतरले. या गोंधळात राहुल गांधी सहभागी झाले होते. ते अधूनमधून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. सभागृहातून बाहेर पडताच राहुल यांनी बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला.
राहुल अडवाणींना भेटले : अडवाणी यांच्या कक्षात जाऊन राहुल यांनी त्यांची भेट घेतली. सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. तुम्ही त्यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. राहुल यांच्यासोबत कमलनाथही होते. त्यावर अडवाणी म्हणाले, तुम्ही संसदेत जे काही केले ते योग्य नव्हते. तुम्ही आपल्या खासदारांना तसे सांगा.
पक्षात सर्वकाही ठिकठाक : सोनिया
राहुल गांधी यांनी वेलमध्ये उतरल्याच्या कृतीवर अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, काँग्रेसमध्ये एक गट नेतृत्वास सक्षम नाही ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आहे. काँग्रेसच्या राजवाड्यात बंडाळी होत आहे. पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. जे स्वत: संसदेत काही बोलत नाहीत ते आज आमच्यावर बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत आहेत. जेटली यांच्या वक्तव्यावर सोनिया म्हणाल्या, त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या, काँग्रेसमध्ये सर्वकाही ठिकठाक आहे.
प्रतिक्रियेची गरज नाही - महाजन : लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. यामध्ये मी काही करू शकत नाही. मी प्रामाणिकपणे काम करत आहे. किती पक्ष आणि त्यांच्या खासदारांना प्रश्न विचारण्याची संधी दिली हे तुम्हीच पाहा.
चर्चेवर काँग्रेसची आडकाठी
काँग्रेसला प्रश्नोत्तरांचा तास रद्द करून चर्चा हवी होती. लोकसभाध्यक्षांनी त्यांना शून्य प्रहरामध्ये मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले होते. या वेळी मोदीही सभागृहात होते. गोंधळामुळे एकदा कामकाज तहकूब करावे लागले. शून्य प्रहरात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, नवे सरकार आल्यापासून देशात जातीय दंगली वाढत आहेत. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशात शांतता असल्याचे सांगत आक्षेप घेतला. संसदेतही शांतता आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लोकसभाध्यक्षांनी खरगे यांना कामकाज सल्लागार समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले. मात्र, खरगे यांना ते मान्य नव्हते. काँग्रेसने दोन नोटिसा दिल्या होत्या. त्यात एक नियम 193 नुसार विशेष चर्चा व दुसरी स्थगन प्रस्तावाची होती.
(फोटो : अध्यक्षांच्या आसनासमोरील हौद्यात घोषणाबाजी करताना खासदार)