आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इराणींच्या विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार, मंत्रिमंडळातून वगळण्याची चार खासदारांची विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मनुष्यबळ विकास मंत्रालय आयआयटी आणि विद्यापीठांच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचे आरोप करीत राज्यसभेच्या चार खासदारांनी स्मृती इराणी यांना मंत्रिपदावरून हटवण्याची विनंती केली आहे. जदयूचे के. सी. त्यागी, सीपीआयचे डी. राजा, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी या खासदारांनी या विषयावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून या शैक्षणिक संस्थांना वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता आयआयटीचे संचालक, केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आणि एका प्रतिष्ठित वैज्ञानिकाचे शोषण तसेच अपमान केल्याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. खासदारांनी लिहिलेल्या पत्रानुसार, मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच या मंत्रालयाच्या मंत्र्यांची भूमिका व्यापक धोरणे बनवणे तसेच आवश्यक निधी ठरवण्यापर्यंतच मर्यादित आहे. आयआयटी किंवा विद्यापीठांच्या कामकाजात ढवळाढवळ करणे त्यांचे काम नाही.

काकोडकर, शेवगावकरांच्या राजीनाम्यानंतर घटना वेगात
- आयआयटी बॉम्बेच्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी मतभेदामुळे राजीनामा दिला होता. काही आयआयटी संचालकांच्या नियुक्त्यांवरून त्यांचे मंत्रालयाशी मतभेद होते. मात्र, त्यानंतर स्मृती इराणी यांच्याशी चर्चेनंतर ते मेपर्यंत पदावर राहण्यास राजी झाले होते.
- तत्पूर्वी, डिसेंबरमध्ये दिल्ली आयआयटीचे संचालक आर. शेवगावकर यांनी राजीनामा दिला होता. मंत्रालयाशी काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्याने त्यांनी पद सोडल्याचे वृत्त होते. अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही.
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्मृती इराणींना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही. आता पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) त्यांना झटका दिला आहे.