आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सशस्त्र सीमा दल आता अनाथ मुलांना देणार सैन्य प्रशिक्षण; 7 राज्यांतील मुलांना संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) वतीने देशातील ७ राज्यांमध्ये पहिल्यांदाच अनाथ मुलांना सैन्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर ही मुले आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात होऊ शकतील. देशातील ९ हजार चाइल्ड केअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून १५ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आयोगाने (एनसीपीसीआर) एसएसबीशी चर्चा करून प्रशिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. 

 

एसएसबीद्वारे देशातील उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अासाम, अरुणाचल प्रदेश अशा सात राज्यांतील इंडो-भूतान आणि इंडो-नेपाळ सीमेवर सुरक्षा पुरवली जाते. एनसीपीसीआर या राज्यांतील अनाथ आश्रमांची माहिती घेईल. मुलांना शारीरिक, मानसिक प्रशिक्षण दिले जाईल. अासाममध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. उर्वरित राज्यांत मुलांच्या नावांची यादी बनवली जात आहे. पुढील महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षणही सुरू होईल. 


एनसीपीसीआरच्या सदस्या रूपा कपूर म्हणाल्या, या योजनेमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल, करिअरला योग्य दिशा मिळेल. महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव म्हणाले, चाइल्ड केअरमधील मुलांच्या भविष्यासाठी मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे. चाइल्ड केअरमध्ये मुलांना मिळणाऱ्या सुविधांच्या आधारावर सेंटरची रँकिंग ठरवण्याचा विचार आहे. या योजनेमुळे अनाथ मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती नाहीशी होईल, असा विश्वास एसएसबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

वय, आवड लक्षात घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम 
मुलांचे वय, शारीरिक क्षमता आणि त्यांची आवड लक्षात घेऊन एनसीपीसीआरने मुलांची वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. याच आधारावर एसएसबीकडून त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला जाणार आहे. पैशाची गरज भासल्यास त्यांना शैक्षणिक कर्जही मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...