आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflict Between Congress And BJP Over Neharu Issue

नेहरूंच्या वारशावरून वादंग!, मोदी नेहरूंची संकल्पना उद्धवस्त करत असल्याचा सोनियांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल, साेनिया गांधी.
नवी दिल्ली - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वारशावरून पेटलेला संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर याच मुद्यावरून गुरूवारी टिकेची झोड उठवली. ‘एकीकडे फोटो काढण्यासाठी झाडू मारत आहेत आणि दुसरीकडे जातीयवादाचे विष पेरत आहेत’, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. नेहरूंची ‘उदारमतवादी भारता’ची संकल्पनाच मोडित काढण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याची टीकाही काँग्रेसने केली.
नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मोदींचे नाव न घेता राहुल म्हणाले की, ‘विद्वेषाची भावना असलेले लोक देशावर राज्य करत आहेत. इंग्रजी हद्दपार करा, आम्ही फक्त हिंदीतच कामकाज करू, असे ते म्हणतात. स्वातंत्र्यानंतर आम्ही असे केले असते तर आमचे तरूण आयआयटी, आयआयएम आणि परदेशात जाऊ शकले नसते. त्यांनी देश व जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र केले काहीच नाही. फक्त लोकांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. समाजाची ठेवण खिळखिळी केली जात आहे, त्याचा जोरकसपणे प्रतिकार केला पाहिजे’.पंडित नेहरूंच्या विचारसरणीवर हल्ले चढवणा-या, त्यांच्या स्वप्नातील भारताची संकल्पनाच उद्धवस्त करू पाहणा-या लोकांविरूद्ध काँग्रेसला लढायचे आहे. देशाची धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी रचना उद्धवस्त करण्याचा होत असलेला प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले.
महापुरूषांच्या वारशावरून संघर्ष
काँग्रेसने १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सम्मेलनाचे आयोजन केले आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जींसह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यासाठी निमंत्रित केले आहे. अनेक देशांतील नेतेही येणार आहेत. मात्र काँग्रेसने मोदींसह एकाही भाजप नेत्याला निमंत्रण दिले नाही. गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलांसह स्वातंत्र्य लढ्यातील अन्य नेत्यांच्या वारशावर मोदी डल्ला मारत असल्याशी त्याचा संबंध जोडला जात आहे.
काँग्रेस कोती : भाजप
पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त देश आणि समाजाच्या ऐक्यावर चर्चा करायला हवी होती परंतु काँग्रेस तिरस्काराचे राजकारण करत आहे. पंडित नेहरू देशाचे नेते होते. मात्र काँग्रेस त्यांना पक्षापुरते मर्यादित करून त्यांची प्रतिमा खुजी करण्याचा प्रयत्न करत आहे, असे भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन म्हणाले.