आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न नकाे, अपेक्षा पूर्ण करा, आझाद यांचे आव्हान; काँग्रेसचा मोदींवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवर "मन की बात' कार्यक्रमात ललित मोदी प्रकरणावर उठलेल्या वादळाविषयी ‘ब्र’सुद्धा उच्चारला नाही. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, "मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांना स्वप्न दाखवले. अजूनही तेच सुरू आहे. हा प्रकार बंद करून आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करा.'

एकाच समुदायाच्या सणांबद्दल मोदी कायम भाष्य करत असल्याचा आरोप आझाद यांनी केला. ललित मोदी प्रकरणात पंतप्रधानांनी असेच मौन बाळगले आणि वादग्रस्त मंत्र्यांविरुद्ध कारवाई केली नाही तर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस आक्रमक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. वादग्रस्त ललित मोदी यांना भारतात परत आणण्यासाठी गेल्या १३ महिन्यांच्या शासनकाळात पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांनी ब्रिटनला किती पत्रे पाठवली याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, असे आवाहनही आझाद यांनी केले.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांवर आरोप करताना म्हटले की, "माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मौनाबद्दल मोदी कायम टीका करत होते. आता महाराष्ट्रातील एक मंत्री, केंद्रातील मंत्री आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होत असताना मोदी गप्प का?' दरम्यान, ललित मोदींना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुद्दाम पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला.

नव्या हरित क्रांतीची गरज
हजारीबाग । देशात लवकरात लवकर दुसऱ्या हरित क्रांतीची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. झारखंडमध्ये हजारीबाग जिल्ह्यात बरही येथील भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. देशाचे पोट आणि शेतकऱ्यांचा खिसा भरेल, अशी शेती शेतकऱ्यांनी करावी. डाळीच्या उत्पादनास सरकार पुरेपूर मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

वाराणसी दौरा रद्द
वाराणसीत ट्रॉमा सेंटरच्या उद््घाटनासाठी मोदी जाणार होते. मात्र, पावसामुळे हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. ज्या मैदानावर मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती ते मैदान पाण्याने भरल्याने हा दौरा रद्द करावा लागला.

बहिणींना "जनसुरक्षा' भेट द्या
"मन की बात' कार्यक्रमात मोदींनी रविवारी जन सुरक्षा योजना या विमा योजनेची बहिणींना भेट द्या, असे आवाहन जनतेला केले. मुलीसोबत सेल्फी काढून "बेटी बचाओ...' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलींसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा आयोजित करणाऱ्या हरियाणातील बीबीपूरच्या सरपंचांचे त्यांनी कौतुक केले. टि्वटरवर लोकांनी मुलीसोबत सेल्फी पाठवून टॅगलाइन जोडावी. यावर रिट्विट करेन, असे मोदी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...