आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धौलपूर महाल ललित मोदी-वसुंधरा राजे यांनी बळकावला,काँग्रेसचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / जयपूर - ललित मोदी प्रकरणात नवा वाद समोर आला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मोदींना बरोबर घेऊन २००९ मध्ये सरकारी मालमत्ता धौलपूर महालावर बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
दोघांनी या जागेत १०० कोटी रुपये खर्च करून लग्झरी हॉटेल बांधले. दोघांच्या मालकी हक्काची कंपनी नियंत हेरिटेज हॉटेल प्रा.लि. हॉटेल चालवत आहे. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. वसुंधरा यांच्यावर ब्रिटनमध्ये आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने त्यांचा राजीनामा मागितला आहे. मोदी यांनी वसुंधरांचे पुत्र दुष्यंत सिंह यांची कंपनी नियंत हेरिटेज हॉटेल्समध्ये पैसा गुंतवला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोमवारी नवे दस्तऐवज समोर आणून वसुंधरा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मौनेंद्र स्वामी संबाेधत म्हटले की, नरेंद्र मोदी नैतिकतेच्या गोष्टी करतात. मात्र या प्रकरणात त्यांनी मौन साधले आहे. त्यांनी झोपेतून जागे झाले पाहिजे. काँग्रेसच्या आरोपांना राजस्थान भाजप नेत्यांनी जयपूरमध्ये उत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी आणि राज्यातील मंत्री राजेंद्र सिंह राठोड म्हणाले, वसुंधरांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने अशा पद्धतीचे आरोप लावले आहेत. सत्तेबाहेर पडल्यामुळे काँग्रेसची तडफड सुरू आहे. काँग्रेसकडून राजेंवरील आरोप वाढले आहेत. भाजप अडचणीत आले आहे.

काँग्रेसकडून आरोपाचे सत्र
- १९५४ मध्ये धौलपूर संस्थान भारतात विलीन झाले होते. धौलपूर महाल आणि त्याची जमीन सरकारकडे आली होती.
- १९५५,१९७७ आणि २०१० च्या सरकारी कागदपत्रांत त्यास सरकारी मालमत्ता ठरवले होते. वसुंधरा यांचे पती हेमंत सिंह यांनी १९८० मध्ये न्यायालयास सांगितले की, धौलपूर महाल सरकारी मालमत्ता आहे.
- सरकारी संपत्तीवर अवैध पद्धतीने कब्जा केल्याच्या आरोपाची कागदपत्रे आहेत. चौकशीची गरज नसलेले हे एक प्रकरण आहे.
भाजपचे उत्तर
- भारत सरकार आणि धौलपूर महाराज हेमंत सिंह यांच्यात १९५६ मध्ये झालेल्या करारात सिटी पॅलेस व केसर बाग हेमंत यांच्याकडे सोपवण्यात आली होती. नगरपालिका रेकॉर्डमध्येही सिटी पॅलेस दुष्यंत सिंह यांच्या नावावर आहे.
- धौलपूर जलदगती न्यायालयाने २००७ मध्ये सिटी पॅलेस,केसर बागसह संपूर्ण मालमत्तेची मालकी दुष्यंत सिंह यांच्याकडे असल्याचे सांगितले होते.
- राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने २०१० मध्ये ५६७ वर्गगज(सुमारे ४७४.०६ मीटर) जमिनीसाठी एक कोटी ९७ लाख ७२० रुपये ५० पैशाचा मावेजा दिला. त्यांची मालकीच नसेल तर मावेजा का दिला?
बातम्या आणखी आहेत...