आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा ‘चकवा’; जालन्यात विलास औताडेंना उमेदवारी; हिंगोलीतून सातव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेसने गुरुवारी 71 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात जालन्यातून विलास औताडे, तर हिंगोलीत राजीव सातव यांना उमेदवारी मिळाली आहे. जालन्यात कल्याण काळे, भीमराव डोंगरे यांची नावे चर्चेत होती. पण औताडेंना तिकीट मिळाल्याने हा काँग्रेसचा ‘चकवा’ मानला जात आहे. औरंगाबाद, नांदेड, लातूर, पुणे, पालघर, चंद्रपूर, यवतमाळचे उमेदवार दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने आधी राज्यातील 13 उमेदवार जाहीर केले. यात 12 विद्यमान खासदार होते. आताच्या यादीतील हिंगोली मतदारसंघ काँगे्रसला मिळाला आहे. या ठिकाणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सातव यांना तिकीट मिळाले. ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. अकोला येथून हिदायत पटेल, वर्धा सागर मेघे, गडचिरोली-चिमूरमध्ये डॉ. नामदेव उसेंडी, भिवंडी विश्वनाथ पाटील आणि हातकलंगणेची उमेदवारी कलाप्पा आवाडे यांना जाहीर झाली आहे.

खासदार दत्ता मेघे यांचे पूत्र व वर्धा मतदारसंघाचे उमेदवार सागर मेघे यांनी ‘प्रायमरीज’मध्ये पक्षाच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांचा 46 मतांनी पराभव केला होता.

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नावाला विरोध केल्याचे समजते. स्वत: अशोक चव्हाण किंवा त्यांच्या अमिता यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध काँग्रेसला सक्षम उमेदवार द्यावा लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा लोकसभेसाठी विरोध दर्शवला आहे. याशिवाय नितीन पाटील, कल्याण काळे यांची नावेही चर्चेत आहेत. पुण्यात खासदार सुरेश कलमाडी इच्छूक असले तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. तथापि, त्यांच्याएवढा दमदार उमेदवार दुसरा नसल्याने कॉँग्रेस अद्याप निर्णयाप्रत पोहचला नाही. यवतमाळमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलगा राहुल यांचे घोडे दामटले असून, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाशदेखील या नावावर अनुकूल असल्याचे कळते. दरम्यान, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँड, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदिगड, लक्षद्वीप व पुड्डूचेरीमधील उमेदवारांची नावे पक्षाचे सरचिटणीस मधूसुदन मिस्त्री यांनी जाहीर केली.

भाजपच्या यादीत पूनम महाजन, शरद बनसोडे
भाजपने 100 जणांची यादी जाहीर केली. यात उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या प्रिया दत्तविरुद्ध पूनम महाजन, तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंविरुद्ध शरद बनसोडे आहेत.