आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यकारिणीत 50 टक्के महिला; ताज्या दमाच्या नेत्यांसमवेत राहुल गांधीची बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी आणि काँग्रेस पक्षाच्या इतर शाखांमध्येही महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व देण्यात येईल अशी घोषणा उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. नव्याने निवडलेल्या काँग्रेसच्या टीम समवेत राहुल यांची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हा विचार बोलून दाखवला.
हा महिला आरक्षणाचा मुद्दा नसून त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीत महिलांनाही समान वाटा देण्यात येईल. बैठकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी आहे. हे राहुल यांच्या लक्षात आल्यानंतर आगामी दोन-तीन वर्षात महिलांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवल्याचे पक्षाचे प्रवक्ते भक्त चरण दास यांनी सांगितले. दरम्यान, सरचिटणीस, सचिवांसोबतच पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये विविध पदे भूषविणार्‍या नेते, कार्यकर्त्यांना जाब देणेही बंधनकारक आहे, अशी तंबीही या वेळी राहुल यांनी दिली.

युत्या, आघाड्यांचा विचार नाही
पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीतील युत्या,आघाड्याचा विषय झाला नाही. इतर पक्षातील कोणत्याही नेत्याचा अथवा आघाडीचा चकार शब्दानेही उल्लेख झाला नाही केवळ काँग्रेस संघटनेशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.

मोदींना महत्त्व देत नाही
भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींचा विषय निघाला का याबाबत छेडले असता चरणदास म्हणाले, अशा गोष्टींत आम्हाला रस असेल असे वाटते का. मोदींना आम्ही महत्त्व देत नाही.

12 सरचिटणीसांमध्ये केवळ अंबिका सोनी या एकमेव महिला विद्यमान कार्यकारिणीत आहे, तर 44 सचिवांमध्ये फक्त पाच महिलांचा समावेश आहे.

सरासरी वय 52
ताज्या दमाच्या नेते, कार्यकर्त्यांचा समावेश केल्यामुळे कार्यकारिणीचे सरासरी वय आता 52 वर आले आहे. ज्येष्ठांचा मान राखूनच पक्षात नव्या रक्ताला वाव देण्याचे धोरण राबवण्यात येत आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

समतोल साधण्याचा प्रयत्न
ज्येष्ठांच्या अनुभवाची त्यांना मदत होईल. त्यांचे हे विधान म्हणजे तरुणांना संधी देतानाच पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही, पक्षात समतोल साधण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे.

कशासाठी बैठक
मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगड आणि दिल्लीमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होत आहेत.त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी ही बैठक खास बोलावण्यात आली.या बैठकीपूर्वी राहुल यांनी या चारही राज्यांच्या प्रभारी सरचिटणीसांसोबत प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा केली.