आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Complains To EC On Narendra Modi\'s Marital Status Issue News In Divya Marathi

नरेंद्र मोदींनी लग्न का लपवले, गुन्हा दाखल करा : काँग्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी विवाहित असल्याचे उघड होताच या मुद्दय़ावरून आता राजकीय लढाई सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात खरपूस समाचार घेतला. त्यांनी (मोदी) अनेक निवडणुका लढवल्या, पण विवाहित असल्याचा प्रथमच उल्लेख केला. पत्नीचे नाव लपवतात, पण महिलेवर पाळत ठेवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतात आणि नंतर दिल्लीत पोस्टर लागते : महिलांचा आदर करा.

राहुल यांच्या हल्ल्यामुळे भाजपचा तिळपापड झाला. रविशंकर प्रसाद म्हणाले, व्यक्तिगत गोष्टींवर टीका बंद करा. आमच्याकडेही नेहरू, इंदिरा, राजीव यांच्यासंबंधीचे अनेक किस्से दस्तऐवज स्वरूपात आहेत. परंतु तसे काही करण्याची आमची इच्छा नाही. वादविवाद सुरू असताना काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. कपिल सिब्बल म्हणाले, मोदींनी आपल्या याआधीच्या शपथपत्रामध्ये विवाह झाल्याचे दडवले. त्यामुळे ती शपथपत्रे खोटी होती हे सिद्ध झाले आहे. हे कायद्याचे उल्लंघन आहे. मोदींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी.

मुलींनाही फाशी दिली जावी : आझमी
नेताजी महिलांना मोठा मान देतात. कोणत्याही धर्मात लिव्ह इन रिलेशनशिप गैरच आहे. लग्नापूर्वी संबंध ठेवणार्‍या मुलींनाही फाशी दिली गेली पाहिजे. (अबू आझमी सपा नेते आहेत.)

मनमोहन सोनियांचे रबरस्टॅम्प : बारू
मनमोहनसिंग हे सोनिया गांधींचे रबरस्टॅम्प होते, असा दावा पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात केला. मात्र काँग्रेसने या दाव्यांना पब्लिसिटी स्टंट व कपोलकल्पित असल्याचे सांगितले. आम्ही आजवर जे सांगत होतो, ते सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी दिली.

अमित शहा-आझमवर बंदी
प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोपी भाजप नेते अमित शहा व सपा नेते आझम खान यांच्या भाषणावर निवडणूक आयोगाने बंदी घातली. दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचेही आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणूक आयुक्तांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धार्मिक भावना भडकावण्यासाठी जाणीवपूर्वक ही वक्तव्ये केल्याचे आयोगाने सांगितले. मंत्री खान यांच्या बाबतीत यूपी सरकारने नरमाईची भूमिका घेतली. अमित शहा यांनी यूपीत सांगितले होते की, ही निवडणूक अपमानाचा सूड घेण्यासाठी एक संधी आहे. दुसरीकडे, आझम खान यांनी गाझियाबादच्या प्रचारसभेत कारगिलची पर्वतशिखरे हिंदूंनी नव्हे मुस्लिमांनी जिंकली होती, असे वक्तव्य केले होते.

काँग्रेस वाजपेयींच्या आश्रयाला
काँग्रेसने आपल्या वेबसाइटवर अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो लावला आहे. यात लिहिले आहे की- मोदी यांनी राजधर्माचे पालन केले नाही. ज्या व्यक्तीला अटलजी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी लायक समजले नाही, त्याच्या हातात तुम्ही देशाचे भवितव्य सोपवू शकता का, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

व्यक्तिगत हल्ले केले तर मग नेहरू, इंदिरा, राजीवपर्यंतची प्रकरणे बाहेर काढता येतील, पण आमची तशी इच्छा नाही : रविशंकर प्रसाद

मोदी पत्नीचे नाव लपवतात, महिलेवर निगराणीसाठी शक्ती लावतात आणि महिलांच्या सन्मानासाठी पोस्टरही लावतात : राहुल गांधी