आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलंकित मंत्र्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा, 15-16 मंत्री कलंकित असल्याचा काँग्रेसचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारातील कलंकित मंत्र्यांवरून काँग्रेसने निशाणा साधला आहे. मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांमध्ये संसदेतून गुन्हेगारांचे उच्चाटन करण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी कलंकित मंत्र्यांना स्थान दिल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केला आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे माहिती आणि प्रसारणमंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यावरही टीका करण्यात आली आहे. निवडणुकीतील आश्वासनपूर्तता न केल्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी माकन यांनी केली. नव्याने समाविष्ट करण्यात आलेले मंत्री वाय. एस. चौधरी यांच्या कंपनीवर ३१७.६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कालच्या विस्तारात दोन ते तीन कलंिकत मंत्री असून ६६ जणांमध्ये त्यांची एकूण संख्या १५ ते १६ आहेत. कर्जबाजारीपणातून सावरण्यासाठी चौधरींना मंत्रिपद दिले काय, असा सवाल करत माकन यांनी केला.

कथनी आणि करणीत फरक
राम शंकर कथारिया यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीत त्यांच्याविरुद्ध २३ खटले दाखल असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्याएवढी गुन्हेगारी प्रकरणे क्वचितच अन्य कोण्या मंत्र्यावर असतील, अेसा टोला त्यांनी लगावला. मंत्री गिरिराज सिंह यांच्या घरातून १.२५ कोटी रुपये जप्त करण्यात आले. प्राप्तिकर खात्याकडून याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात कलंकित कोण आहे, हे संपूर्ण देश जाणून घेऊ इच्छितो. कथनी आणि करणीत फरका का केला जातो? गुन्हेगारमुक्त संसद करण्याची एकीकडे घोषणा केली जात असताना मंत्रिमंडळात कलंकित नेत्यांना स्थान देण्यात आल्याचे माकन म्हणाले.

खातेबदलावरही आक्षेप
मंत्र्यांच्या खातेबदलामागे कोणतेही तार्किक कारण नाही. डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य मंत्रालय असताना व्यवसायाने वकील जे. पी. नड्डा यांच्याकडे हे मंत्रालय सोपवण्यात आले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी विविध खात्यांमध्ये सुसूत्रता आणणार असल्याचे सांगितले होते. अर्थ मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयामध्ये कोणता समन्वय आहे, ज्यामुळे जेटलींकडे ही दोन्ही खाती देण्यात आली आहेत?

सरकारचा यू-टर्न
पंतप्रधानांनी किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासनाचा दावा केला होता. तुम्ही यामध्ये यू-टर्न घेतला नाही काय? मोदीजी, तुम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. डी. व्ही. सदानंद गौडा यांना रेल्वे मंत्रालयातून कायदा मंत्रालयात का हलवले? कामगिरीच्या आधारावर आरोग्य व रेल्वेमंत्री बदलले असतील तर मोदी सरकार या काळात संपूर्ण अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते, असे माकन यांनी सांगितले.