आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल हेरॉल्डवरून वाद, काँग्रेसचा गदारोळ सुरूच, चौथ्या दिवशीही काम ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्डच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्यांचा गोंधळ पुन्हा पाहायला मिळाला. त्यामुळे शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही. वरिष्ठ सभागृहाचे कामकाज न होण्याचा सलग चौथा दिवस होता. ही सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे शून्य प्रहर घेता आला नाही. प्रश्नोत्तरांच्या काळात गदारोळ झाल्याने संबंधित मंत्री केवळ तीन प्रश्नांचे उत्तर देऊ शकले. त्यानंतर कामकाज पहिल्यांदा साडेबारा, त्यानंतर अडीचपर्यंत स्थगित करावे लागले. दुपारच्या भोजनानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. त्या वेळी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भूमिका मांडली. नॅशनल हेरॉल्डच्या मुद्द्यावर काँग्रेस कामकाज स्थगित करत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले आहे. परंतु विरोधाचा नॅशनल हेरॉल्डशी कसलाही संबंध नाही, असा दावा आझाद यांनी केला. वास्तविक पहिल्या दोन दिवशी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी मागे केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सभागृहात विरोध करण्यात आला. त्यानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई न झाल्याच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे तर दूरच, परंतु सरकार त्यांना साधी नोटीसही बजावत नाही. हा दुटप्पीपणा आहे. त्याला काँग्रेसचा विरोध आहे, असे आझाद म्हणाले.

सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला विरोध : आझाद यांच्या स्पष्टीकरणानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. सत्ताधारी पक्षाने सायंकाळी पाचनंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात करावी, असा प्रस्ताव ठेवला. त्याला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर काँग्रेसचे खासदार सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करू लागले. हे पाहून उपसभापती पी.जे. कुरियन यांनी कामकाज साडेतीन वाजेपर्यंत स्थगित केले. त्यानंतर कामकाज सुरू झाले तेव्हा दोन्ही बाजूंनी सहमती झाली. परंतु काही मिनिटांतच बिगरसरकारी सदस्यांच्या मुद्द्यावर चर्चेविनाच कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले.
क्षमायाचनेचा प्रश्नच नाही : वीरेंद्र सिंह
आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर क्षमायाचनेचा प्रश्न उद््भवत नाही, असे भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली असून त्यावरून गदारोळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी विचारपूर्वक हा मुद्दा मांडला होता. लोकशाहीची ही मागणी आहे की, आता केवळ राणीच्या पोटी राजा जन्माला येणार नाही. मी अजूनही या वक्तव्यावर ठाम आहे. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधानांना हिटलर म्हटले जाते. संसदेचे कामकाज ठप्प केले जाते. ही कृती करणाऱ्यांनी माफी मागवी, असे सिंह म्हणाले.
अडेलतट्टूपणामुळे समस्या : भाकप
बलिया । केंद्र सरकार सुडाच्या भावनेतून काम करत आहे. पंतप्रधान आणि मंत्री सातत्याने संसदेचा अवमान करत आहेत. सरकारचा अडेलतट्टूपणा संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणारा ठरला आहे, असा आरोप भाकपचे सचिव अतुलकुमार अंजान यांनी केला आहे. केंद्रावर टीका होत आहे.