आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Gives Ticket To Ashok Chavan News In Marathi

खुर्ची वाचवण्यासाठी अशोकरावांना तिकीट; पृथ्वीराज चव्हाण यांची खेळी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कलंकित नेत्यांना उमेदवारी देणार नसल्याची घोषणा करणार्‍या कॉँग्रेसने नांदेडमध्ये मात्र अशोक चव्हाणांना उमेदवारी देत आपल्याच तत्त्वांना तिलांजली दिली. विशेष म्हणजे आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी आरोप असलेल्या अशोकरावांना ‘क्लीन चिट’ मिळवण्यात अडथळा आणणार्‍या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच त्यांच्या उमेदवारीसाठी शब्द टाकल्याचे सांगितले जाते. राज्याचे नेतृत्व अशोकरावांकडे देण्याच्या हालचाली पक्षर्शेष्ठींनी सुरू केल्या होत्या. त्यामुळे आपल्या स्पर्धकाला ‘दिल्ली’त पाठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा खटाटोप केल्याचीही चर्चा आहे.

अशोकरावांविरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी नाकारली. चौकशी आयोगानेही क्लीन चिट दिल्याने अशोकराव राज्यात सक्रिय होण्याच्या तयारीत होते. विलासरावांच्या पश्चात कॉँग्रेसला राज्यात मासलीडर नसल्यामुळे पक्षर्शेष्ठीही त्यांच्याबाबत अनुकूल होती. मात्र राहुल गांधी यांना एका पत्रकाराने ‘खोचक’ प्रश्न विचारून अशोकरावांचा विजनवास वाढवला. यामागे बाबांचेच ‘डोके’ असल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे व्यथित अशोकराव ‘त्या’ पत्रकाराचा शोध घेत होते. दुसरीकडे, पृथ्वीराजबाबांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसचे मंत्री, आमदार नाराज होते. राज्यातील नेत्यांची कुजबुज अनेकदा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या कानावर गेली. त्यामुळे अशोक चव्हाणांसारख्या नेत्याचे राज्यात पुनरुज्जीवन करावे, अशी शिफारस महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी श्रेष्ठींकडे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. याच दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने ‘आदर्श’ प्रकरणी थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करून राज्यपालांना परत बोलावण्याचीही मागणी केली.

पक्षश्रेष्ठींकडे टाकला शब्द
राज्यात स्थिरावणे सोपे नसल्याचा अंदाज अशोक चव्हाण यांनाही आला. त्यामुळेच त्यांनी लोकसभा लढवण्याचा पर्याय निवडला. त्यांच्यासाठी नांदेडचे खासदार व मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनीही निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. मात्र ‘आदर्श’चे सावट असल्यामुळे अशोकरावांना लोकसभेची उमेदवारी द्यावी की नाही, यावर कॉँग्रेस पक्षात खल सुरू होता. मात्र ते राज्यात परतल्यास आपल्या खुर्चीला धोका ओळखून मुख्यमंत्री चव्हाण यांनी अशोकराव हेच नांदेडसाठी कसे योग्य उमेदवार आहेत, हे श्रेष्ठींना पटवले असल्याचे सांगितले जाते.