आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फूट पाडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयश का?, आझाद यांचे पंतप्रधानांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजात फूट पाडणारे आणि प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या संघ परिवाराशी संबंधित लोकांना रोखले जात नाही. ही गोष्ट चकित करणारी आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत या माध्यमातून फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, त्यासाठी भाजप सरकारची ही व्यूहरचना आहे, असा ‘संशय’ येऊ लागतो. तसे नसते तर अशा व्यक्तींवर का अंकुश लावण्यात आला नाही, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात आझाद यांनी हा प्रश्न केला आहे.
देशातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील घटनाही अगदी ताजी आहे. तेथे दोन व्यापाऱ्यांची हत्या करण्यात आली. अशा प्रकारच्या समूह हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. लोकशाहीप्रधान देशाला अशा घटना शोभणाऱ्या नाहीत. कारण या देशात न्यायाचे, कायद्याचे राज्य आहे, असे आझाद यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या दोन पानी पत्रात नमूद केले आहे.
धमक्या, जमावाकडून होणारी हिंसा, दहशतीचे वातावरण या गोष्टी दिसू लागल्या आहेत, हे दुर्दैवी आहे. बहुमतवादाची अरेरावी घातक आहे. त्यामुळे लोकशाही, सामाजिक सौहार्द, शांततेला धोका आहे. त्याचा परिणाम विकासावर होतो, असा इशारा आझाद यांनी दिला आहे. सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री संघपरिवाराला हवे असलेले विचार आपल्या वक्तव्यातून मांडतात. त्यातून समाजात दुही आणि ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न दिसतो. परंतु त्यावर सरकार कोणत्याही प्रकारे लगाम घालताना दिसत नाही, हे धक्कादायक आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी फूट पाडण्यासाठी ही भाजपची व्यूहरचना आहे, असा संशय येऊ लागतो.
जातीय विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न
सांप्रदायिक पातळीवर विद्वेष निर्माण व्हावा, यासाठी काही लोक जाणीवपूर्वक वक्तव्ये करत आहेत. त्यावरून संपूर्ण देश चिंतेत आहे. केवळ निवडणुकीचे राजकारण करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. म्हणूनच विपरीत घडण्यापूर्वीच तातडीने हे सर्व प्रकार थांबवले गेले पाहिजेत, असे आझाद यांनी म्हटले आहे.देशात इतरही अनेक समस्या आहेत.
गाेहत्या बंदीबाबत संभ्रम नाही
देशातील बहुतांश राज्यात गोहत्येवर बंदी आहे. त्याबाबत कोणताही संभ्रम नाही. गोहत्येवर बंदी नसावी, असे कोणालाही वाटत नाही; परंतु सामान्य प्राण्यांच्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीला लक्ष्य करता कामा नये. या व्यवहारावर संघ परिवार लक्ष ठेवून असतो. गोहत्या समजून जमाव हल्ले करतो. त्यात अल्पसंख्याक समुदायाला अकारण झळ पोहोचू लागली आहे. हे जमाव कायदा हातात घेतात, असे आझाद यांनी पत्रात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...