(फाइल फोटो: कॉंग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित)
नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांनी एका पत्रकाराशी गैरवर्तन केल्याने नवा वाद उद्भवला आहे. त्यात आता एका कॉंग्रेसी नेत्याने उडी घेतली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी रॉबर्ट वडेरा यांच्या गैरवर्तवणुकीवर टीका केली आहे. रॉबर्ट वढेरा यांनी शिष्टाचाराचे भान राखावे, अशा शब्दात संदीप दीक्षित यांनी टीका केली आहे.
भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी वढेरांच्या गैरवर्तवणुकीचा निषेध केला होता. आता त्यात काँग्रेसचे नेते आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी उडी घेवून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
संदीप दीक्षित म्हणाले, वढेरा यांनी पत्रकाराशी संवाद साधताना मूलभूत शिष्टाचाराचे पालन करायला हवे. तसेच वढेरांसाठी हा
आपला वैयक्तीक सल्ला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ता म्हणून वरील वक्तव्य केले नसल्याचेही दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी, वढेरांचा कॉंग्रेसच्या नेत्यांनी बचाव केला होता. तसेच आता संदीप दीक्षित यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसच्या एका नेत्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जे.पी.अग्रवाल म्हणाले, दीक्षित यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. दीक्षित यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री एक रेस्टरॉंमधील एका कार्यक्रमात रॉबर्ट वढेरा यांनी मीडियाशी हुज्जत घातली होती. वढेरा यांना हरियाणातील जमीन सौद्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. एका हॉटेलच्या जिममध्ये वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने शनिवारी वढेरा यांना वादग्रस्त डीएलएफ सौद्याप्रकरणी प्रश्न विचारले. त्यावर वढेरांनी या प्रतिनिधीच्या हाताला झटका देऊन त्याचा मायक्रोफोन फेकून देण्याचा प्रयत्न केला.
रविवारी मीडियामध्ये हे प्रकरण चर्चिले गेले. सुरुवातीला काँग्रेसने वाद व्यक्तिगत असल्याचे सांगून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे संबित पात्रा यांनी म्हटले की, वढेरांनी भारताला बनाना रिपब्लिक लोकांना मँगो पीपल म्हटले होते. परंतु भारत बनाना रिपब्लिक नाही हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. भाकपचे नेता डी. राजा यांनीही एखाद्या मान्यवर व्यक्तीचे हे वर्तन दुर्दैवी असल्याची टीका केली आहे.