नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नव्याने पक्ष बळकटीची रणनीती आखत असतानाच एक नवी समस्या समोर आली आहे. काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अजय माकन यांनी सोमवारी
ट्विटरवर पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध केली आणि यापुढे हीच मंडळी पक्षाच्या वतीने अधिकृत माहिती देतील, असे म्हटले आहे. त्यानंतर मनिष तिवारी यांनी, 'मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता असून, सार्वजनिकरित्या मला माझे विचार मांडण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही,' असे म्हटले आहे. अशाच पद्धतीचे वक्तव्य राशिद अल्वी यांनी देखील केले आहे.
अजय माकन यांनी ट्विटरवर पाच वरिष्ठ प्रवक्ते आणि 13 प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाच्या या आदेशाला विरोध करताना अल्वी आणि तिवारी यांनी म्हटले आहे, की सध्या जातियवादी शक्तींशी लढण्याचा काळ आहे.
आपण आपसात एकमेकांचा अपमान करु नये. तिवारींनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'मला माझे विचार सार्वजनिकरित्या मांडण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून मी माझे विचार मांडत राहाणार.' राशिद आल्वींनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले. ते म्हणाले, 'मी सामान्य कार्यकर्ता असून पक्षाची बाजू मांडत राहाणार आहे.'
का घातले बंधन
काँग्रेस कम्युनिकेशन विभागाने नव्याने प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध करण्यामागे अल्वी आणि तिवारींना लगाम घालण्याचेच राजकारण असल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवासांमध्ये या दोन्ही नेत्यांनी पक्ष धोरणा व्यतिरिक्त टिप्पणी केली आहे. वास्तविक या दोन्ही नेत्यांनी या तक्रारी फेटाळल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दिग्विजयसिंह, जनार्दन द्विवेदी, शीला दीक्षित, मणिशंकर अय्यर यांच्यासह इतर काही नेत्यांच्या वाचाळ वृत्तीने पक्षाची फजिती केली होती. पक्षाने या नेत्यांची वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत मते असल्याचे सांगून त्यापासून अंगझटकले होते.
काँग्रेसकडून स्पष्टीकरण
काँग्रेस महासचिव शकील अहमद यांनी प्रवक्तेपदाच्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, पक्षाने इतर नेत्यांच्या बोलण्यावर किंवा त्यांना त्यांचे मत मांडण्यावर बंदी घातलेली नाही. फक्त अधिकृत प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध केली गेली आहे.
कोण आहेत प्रवक्ते
पाच वरिष्ठ प्रवक्ते : गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शीद, आनंद शर्मा, मुकुल वासनीक आणि पी. चिदंबरम.
13 प्रवक्ते : अभिषेक मनु सिंघवी, ज्योतिरादित्य सिंधिया, सत्यव्रत चतुर्वेदी, पी.सी. चाको, राजबब्बर, रणदीप सुरजेवाला, रीता बहुगुणा जोशी, संदीप दीक्षित, संजय झा, शकील अहमद, शक्ति सिंह गोहिल, शशि थरूर आणि शोभा ओझा.