आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress MPs Issued Noticed Of Non Confidence Against UPA Government

काँग्रेसच्याच खासदारांचा यूपीए सरकारविरूध्‍द अविश्वास ठरावाची नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संयुक्त संसदीय समितीच्या वादग्रस्त टूजी अहवालाच्या मुद्द्यावर विरोधी खासदारांनी संसद दणाणून सोडली. महागाई, मुजफ्फरनगर मदत छावणीत मुलाचा मृत्यू तसेच तेलंगणाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान तेलंगणच्या मुद्यावर सत्ताधारी काँग्रेसच्याच सीमांध्रमधील खासदारांनी यूपीए सरकारविरूद्ध अविश्वास ठरावाची नोटीस दिल्याने सरकार पुढे नवाच पेच निर्माण झाला आहे.
सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तेलगू देसम, डावे आणि बसपाचे खासदार विविध घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरले. घोषणाबाजीमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी 2 वाजता कामकाजास सुरुवात झाल्यानंतर पुन्हा याच मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घातला. यानंतर सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
दोन्ही सभागृहामध्ये तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्य स्थापण्यास विरोध केला. या खासदारांच्या हातात ‘सेव्ह आंध्र प्रदेश’चे पोस्टर होते. बसपा खासदारांनी मुजफ्फरनगर मदत छावणीच्या दुरवस्थेबाबतच्या वृत्ताची कात्रणे दाखवली.
महागाईच्या मुद्द्यावरील चर्चेला नकार दिल्यामुळे डाव्या पक्षाचे खासदार आक्रमक झाले. केरळमधील काँग्रेसचे खासदार जोस के. मणी यांनी रबर आयातीला विरोध करून त्यावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली.
चाको यांनी अहवाल मांडताच द्रमुक, भाजप, डावे, तृणमूल काँग्रेस, बीजद आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांनी जागेवरून उठून घोषणा देण्यास सुरुवात केली. गुरुवारी संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर दोन विद्यमान सदस्य व दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळे दोन दिवस कामकाज तहकूब करण्यात आले.
लोकसभेमध्ये भाजप नेते यशवंत सिन्हा, हरीन पाठक, माकपचे गुरुदास दासगुप्ता, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी टूजी अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. अहवालामुळे राज्यघटनेचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी द्रमुक खासदारांनी सभात्याग केला. द्रमुक खासदार टी. आर. बालू आणि माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनीही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन आक्रमक पवित्रा घेतला. यादरम्यान एका द्रमुक खासदाराने काही कागदपत्रे फाडली. या गोंधळात दुपारी 2 पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.
टूजी अहवालात काय ?
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालात पंतप्रधान मनमोहनसिंग यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी पंतप्रधानांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लोकसभेत गोंधळामध्येच हा अहवाल मांडण्यात आला. लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर जेपीसीचे अध्यक्ष पी.सी. चाको यांनी अहवाल मांडला.