आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस बनवणार नवी टीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी दज्रेदार नेत्यांची नवी टीम उभी करण्याचा दबाव काँग्रेसवर असणार आहे. यावर काँग्रेसमध्ये सध्या मोठी खलबते सुरू असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांसोबत बैठका घेण्याचा सपाटाच लावला आहे.

पक्षाला विधानसभेसाठी केंद्रासोबत राज्यस्तरावरही बदल करायचे असून केंद्रातील अनेक प्रभारी नेत्यांना लोकसभेतील त्यांच्या कामगिरीनुसार स्थान दिले जाणार आहे. ज्या नेत्यांचा लोकसभेत पराभव झाला आहे त्यांना राज्यात प्रभारीपद दिले जाऊ नये, असा सूर पक्षात उमटत आहे. यात बिहारचे प्रभारी सी.पी.जोशी, गुजरातचे प्रभारी गुरुदास कामत, उत्तर प्रदेशचे प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांचा समावेश आहे. लोकसभेत यांना पराभवाचा झटका बसला आहे. शिवाय यांच्याकडे ज्या राज्यांची जबाबदारी होती तिथे काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभा निवडणुकीबाबत तसेच नेतृत्व आणि प्रभारींबाबत केंद्रीय समितीत मोठी खलबते सुरू आहेत. जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी नवीन रणनीती आखण्याचेही काँग्रेसमध्ये काम सुरू झाले आहे.

राहुल गांधींचाही फॉर्म्युला बदलणार
लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी पक्षात कॉर्पोरेट स्टाइलने उमेदवार निवडीसाठी ‘प्रायमरीज’ या संकल्पनेवर भर दिला होता. त्यांनी यूथ काँग्रेस तसेच एनएसयूआयमध्ये निवडणुका घेऊन उमेदवार निश्चित केले. मात्र, त्यांचा हा निर्णय अंगलट आला. त्यामुळे राहुल गांधी यांनी व्यावहारिक पद्धतीचाच अवलंब करावा असा सूर पक्षातून उमटत आहे. त्यामुळे ते आपल्या पद्धतीत बदल करतील असे म्हटले जात आहे.