आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची चहुबाजूने कोंडी; विधानसभा निवडणुकीच्या कामगिरीबाबतही साशंक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्याप्रकरणी भाजपने गांधी व काँग्रेस दोघांवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस हा नैराश्य पसरलेला पक्ष असल्याची टीका भाजपने केली आहे, तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे.

राहुल यांनी लोकसभाध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यावर संपूर्ण भाजप काँग्रेसवर तुटून पडला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे अध्यक्षा सोनिया गांधी, पुत्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हरियाणा, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील निवडणुकांआधी तेथे पक्ष संघटनेत बेशिस्त आणि वाद समोर येत आहेत. खासदार अवतारसिंह भडाना यांनी राजीनामा देऊन हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांच्याविरुद्ध पत्रकबाजी करून नेतृत्वाला आव्हान दिले आहे, तर दुसरे नेते वीरेंद्रसिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. केवळ कार्यकारिणीतून वगळण्याव्यतिरिक्त काँग्रेस त्यांच्यावर काहीच कारवाई करू शकली नाही. काँग्रेस कार्यकारिणीतील माजी सदस्य जगमितसिंह बरार यांनी आपल्या पत्रकात त्यांनी सोनिया आणि राहुल यांना काँग्रेसपासून दोन वष्रे दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांनी दुरुस्ती करत दोघांनी भारत दौर्‍यावर जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर बरार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सडकछाप कुत्र्यांसारखे समजते, असा आरोप करत ज्येष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.

माजी मंत्री नटवरसिंह यांच्या आरोपांनंतर सावरणार्‍या काँग्रेसला डॉ. मनमोहनसिंग यांची कन्या दमनसिंग यांनी धक्का दिला आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात वडिलांना काँग्रेसच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला, असे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची आणखी माती होणार असल्याची शक्यता एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या हे पचनी पडत नाही. राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नृपेंद्र मिर्शा प्रकरणात काँग्रेसला साथ दिली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते जागावाटपात दबाव टाकत आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची या मुद्दय़ावर दिल्लीत चर्चा झाली आहे.