आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, India Pakistan Relation, Divya Marathi

पाकिस्तानी धोरणाबाबत मोदी सरकार गाढ झोपेत, काँग्रेसचा सरकारवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानसोबत सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तान धोरणाबाबत भारत सरकार गाढ झोपेत आहे. सरकार या विषयात बाजूला फेकले गेले आहे. पाकिस्तानी अधिका-यांची हुर्रियत नेत्यांशी चर्चा हा द्विपक्षीय चर्चेपूर्वी केला जाणारा विधी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शेजारी देश फुटीरतावाद्यांशी चर्चा व सरकारसोबतच्या वाटाघाटी एकाच वेळी करू शकत नसल्याचे सांगत भाजपने सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

सध्याच्या परिस्थितीतही सरकारने सुरुवातीस पाकिस्तानमध्ये चर्चा करण्याचे मान्य केले होते. लोकांचा रोष वाढल्यानंतर सरकार गाढ झोपेतून जागे झाले आणि चर्चा रोखण्याची प्रतिक्रिया दिली. फुटीरतावादी सरकारला आव्हान देत आहेत. पाकिस्तान उच्चायुक्त फुटीरतावाद्यांसोबत प्रस्तावित चर्चा पुढे सुरू ठेवत आहे. अशा स्थितीत आता सरकारची पुढील रणनीती काय राहील, असा सवाल तिवारी यांनी केला.

वाटाघाटी कठीण
सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, मुद्दा सरळ आहे. पाकिस्तानने एक तर भारत सरकारशी किंवा फुटीरतावाद्यांशी चर्चा करावी. फुटीरतावाद्यांशी चर्चेला प्राधान्य दिल्यास द्विपक्षीय संबंधांतील वाटाघाटी पुढे सरकणे कठीण असल्याचे त्यांना निक्षून सांगितले होते. एवढे होऊनही पाकिस्तानी उच्चयुक्तांनी त्यांना बोलावणे धाडले.
ही बाब योग्य नाही.

पाकच्या हवाई हल्ल्यात 18 ठार
पाकिस्तानच्या लढाऊ विमानाने वायव्य प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात मंगळवारी 18 अतिरेकी ठार झाले. उत्तर वजिरिस्तान आणि खैबर भागातील अतिरेक्यांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. यामध्ये खैबर भागातील पाच, तर वजिरिस्तानमधील सात ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

शांतता प्रक्रियेसाठी धक्का : पाक मीडिया
भारत-पाक सचिव स्तरावरील चर्चा रद्द होणे द्विपक्षीय संबंधांसाठी मोठा धक्का असल्याचे मत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतून उमटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी समारंभाला पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण दिल्यानंतर हे उचललेले पाऊल नव्या घटनाक्रमाला मागे खेचणारे आहे, असे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. मोदी आणि शरीफ यांच्या मे महिन्यातील चर्चेत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सचिव स्तरावरील चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मोदी यांनी आपल्या काश्मीर दौ-यात पाकिस्तान छुपे युद्ध करत असल्याचे म्हटले होते. नव्या निर्णयाची पार्श्वभूमी या वक्तव्याशी संबंधित असल्याचे डॉनने नमूद
केले आहे.