आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - निवडणूक लढवण्याविषयी तळ्यात-मळ्यात करणारे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस निवडणुकीत अंडरडॉग आहे, असे म्हटले आहे. परंतु राहुल गांधी यांना असे वाटत नाही. दहा वर्षांपासून सत्तेवर आहोत. त्यामुळे आपल्याविरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे. परंतु निवडणुकीत काँग्रेस अंडरडॉग नाही. हे आव्हान जरूर आहे. मात्र आम्ही विजयी होऊ. यूपीए-3 चे सरकार बनेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. मी ज्योतिषी नाही. जागांबाबत कोणीही आकडा सांगू शकत नाही. परंतु आम्ही 2009 पेक्षा चांगली कामगिरी करू. काँग्रेस 2009 पेक्षा अधिक चांगले प्रदर्शन करेल. 2009 मध्ये काँग्रेसने 206 जागा मिळवल्या होत्या. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीमध्येही काँग्रेसचा दारुण पराभव होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, असे राहुल यांनी सांगितले.
सुपर सरकार
हा आरोप खरा नाही. माझे सरकारशी अनेक बाबतीत मतभेद आहेत. परंतु माझे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. लोकपालला घटनात्मक संस्था बनवावी, अशी मागणी केली होती. परंतु माझे ऐकले गेले नाही. कलंकित मंत्र्यांना वाचवणार्या अध्यादेशावरही सुरुवातीला कोणी ऐकले नव्हते. त्या वेळी मी माझे मत जाहीरपणे मांडले. पक्षाने माझे म्हणणे मान्य केले. वादही झाला.
शीख दंगलीवर
पंतप्रधानांनी माफी मागितली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खेद व्यक्त केला. मी त्यांच्या भावनेसोबत आहे.
द्रमुक-तृणमूलसंबंधी
राष्ट्रवादी, राजद, झामुमो, रालोद तसेच नॅशनल कॉन्फरन्ससोबत आमची आघाडी आहे. द्रमुक आणि तृणमूलसह सर्वांना सोबत घेऊन काम करू, ज्यांच्यासोबत विचार जुळतात, त्यांच्यासोबत काम करू.
संघटनात्मक सुधारणा
व्यवस्थेत सुधारणा करण्याची इच्छा असलेले लोक अनेकदा त्याच व्यवस्थेचा एक भाग असूनही बंड करतात. आम्ही एनएसयूआयमध्ये निवडणूक घेतली. 15 जागांसाठी प्राथमिक (उमेदवारांच्या निवडीसाठी) पातळीवर निवडणूक घेतली होती.
कार्यकारिणीत निवडणूक का नाही ?
100 टक्के सहमत आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष सध्याच्या स्थितीत नामनिर्देशित स्वरूपात आहे. पक्षातील प्रत्येक ढांचा अशाच स्वरूपाचा आहे. परंतु मुख्य संरचनेला लोकनियुक्त असे स्वरूप देण्यासाठी त्याच्या पायाभूत संरचनेत बदल करावा लागेल. त्याला लोकनियुक्तीचे स्वरूप द्यावे लागेल.
यूपीए सरकारचे खराब प्रदर्शन
गेल्या 10 वर्षांत यूपीए सरकारने सर्वाधिक विकास दर दिला आहे. 15 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. माहिती, शिक्षण आणि रोजगाराचे अधिकार दिले आहेत. परिवर्तनाचे राजकारण सुरू केले आहे.
विरोधी पक्षाचे नेते व्हायला आवडेल ?
मी 2004 मध्ये राजकारणात आलो. त्या वेळी सरकार सत्तेवर नव्हते. काँग्रेसला फेटाळण्यात आले होते. मी राजकारणात आलो, कारण मी या देशावर नितांत प्रेम करतो. मला येथे काहीतरी चांगले करण्याची इच्छा आहे.
विवाह कधी करणार ?
हा प्रश्न नेहमी विचारला जातो. मी सध्या निवडणूक लढवण्यात मग्न आहे. खासगी जीवनाकडे लक्षच देऊ शकलो नाही. जेव्हा योग्य मुलगी भेटेल. तेव्हा विवाह करेन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.