आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न सुरक्षा, भूसंपादन विधेयकाच्या रूपाने काँग्रेसचे पुन्हा ‘गरिबी हटाओ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुका अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच अन्न सुरक्षा आणि भूसंपादन विधेयकाच्या रूपाने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ‘गरिबी हटाओ’ची मोहीम पुढे नेण्याचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मानस असल्याचा संदेश खेड्यापाड्यातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याची काँग्रेसची योजना आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना व यशस्वी मोहिमांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात येत आहे. सामान्यातील सामान्य मतदारांपर्यंत प्रस्तावित भूसंपादन विधेयकाचे फायदे पोहोचवण्याच्या योजनेचा भाग म्हणून काँग्रेसने पक्षाचे प्रवक्ते आणि टीव्ही पॅनलिस्ट्सची कार्यशाळा आयोजित केली आहे. अन्न सुरक्षा विधेयकाबाबत अशीच कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली होती. लोकसभेत मंजूर झालेली ही दोन्ही विधेयके या आठवड्यात राज्यसभेत मंजूर होण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही विधेयकांकडे काँग्रेस आगामी सार्वत्रिक निवडणुकीतील ‘गेम चेंजर’ म्हणून पाहत आहे.

सोनियांकडून इंदिराजींच्या स्वप्नाची पूर्तता
देशातील गरिबी हटविण्याचे इंदिरा गांधींचे स्वप्न होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गरीब आणि आधारवंचितांच्या भूक आणि कुपोषणाचा प्रश्न सोडवून इंदिराजींचे ‘गरिबी हटाओ’चे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तेच काँग्रेसच्या संप्रेषण विभागाचे प्रमुख आहेत. ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश हे या कार्यशाळेत भूसंपादन विधेयकाच्या फायद्यांचे विश्लेषण करून सांगणार आहेत.


अशी आहे योजना
काँग्रेसचे प्रवक्ते आणि टीव्ही पॅनलिस्ट्सना भूसंपादन विधेयकाचे सर्वंकष फायदे समजून सांगून त्यांना प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे प्रबोधन करण्यासाठी पाठवले जाईल. तेच स्थानिक पातळीवर पत्रकार परिषदा घेऊन या विधेयकाचा प्रचार करतील. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनांची सर्वंकष माहिती देणारी पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे.देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गरिबांना मोठय़ा सबसिडीवर अन्नाचा हक्क मिळाला असून आता देशात कुणीही उपाशी राहणार नाही, असा जोरकस प्रचार केला जाणार आहे.

महागाईविरोधात भाकप रस्त्यावर
चांगल्या कामांचा प्रचार
यूपीए सरकारने केलेली ‘चांगली कामे’ आणि लोकांसाठी सरकारने उचललेली ‘सकारात्मक’ पावले याचा प्रचार करण्याच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अजय माकन, कार्यशाळेचे संयोजक


इंदिरा गांधींचा नारा
सन 1971 मध्ये काँग्रेस पक्षात प्रचंड फाटाफूट होऊन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी अडचणीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘गरिबी हटाओ’ चा नारा दिला होता. या घोषणेवर त्यावेळी काँग्रेस सत्तेवर आली होती.