आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींसाठी काँग्रेसचे धोरण बदलले, वाराणसीला ‘प्रायमरीज’ मधून वगळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसने वाराणसी लोकसभा मतदारसंघ प्रायमरीज यादीतून वगळला आहे. त्याऐवजी आंबेडकरनगर लोकसभा मतदारसंघाचा त्या यादीत समावेश केला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी ठोस माहिती मिळाल्याने काँग्रेसने हा धोरणात्मक बदल केला आहे. राहुल गांधी यांच्या प्राधान्य यादीच्या धोरणानुसार या मतदारसंघातून उमेदवार निवडला असता तर तो मोदींविरोधात तगडी लढत देऊ शकणार नाही. त्याऐवजी पक्षातर्फे एखादा तगडा नेता मोदींविरोधात उतरवण्याची पक्षाची तयारी आहे. काही कारणांमुळे मोदी वाराणसीतून निवडणूक लढणार नसले तरीही तेथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार लढवण्याचे पक्षाचे धोरण आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची ठोस माहिती आम्हाला विविध स्रोतांकडून मिळाली आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी करतात. त्यांनी येथूनच आगामी निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. परंतु मोदी या मतदारसंघातून उभे राहिले तर त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीत कायम ठेवले जाऊ शकते. याबाबत जोशी यांना विचारले असता ते म्हणाले की, यासंदर्भात अद्याप आपल्याशी कुणीही संपर्क साधला नाही. काँग्रेसने कुणालाही उमेदवारी दिली तरीही फारसा फरक पडणार नाही. येथून भाजपच विजयी होईल.
सूत्रांनुसार मोदींविरोधात तुल्यबळ उमदेवार देऊन पक्ष त्या माध्यमातून जनतेपर्यंत ठोस संदेश देऊ इच्छितो. मोदींना आम्ही सहजासहजी विजयी होऊ देणार नाही. त्यामुळेच त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची पक्षाची तयारी आहे.
अर्थात तो उमेदवार कोण असेल किंवा तेथून पक्षाचा संभाव्य उमेदवार कोण असेल याबाबत सूत्रांनी काहीही सांगितले नाही. येथील संभाव्य उमेदवारांबाबत अनेक नावांची चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या धोरणानुसार ही जागा जर प्रायमरीजच्या यादीत असती तर तेथून इच्छुक असणार्‍या नेत्यांमधूनच मतदारांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन एखाद्याला उमेदवारी द्यावी लागली असती. तो उमेदवार मोदींसारख्या तगड्या नेत्याविरोधात तग धरू शकेलच याची शास्वती नव्हती. ऐनवेळी पक्षाने तेथील उमदेवार बदलला असता तर त्यावरूनही वादंग झाले असते. त्यामुळे पक्षाने ही जागा प्रायमरीजच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला.