नवी दिल्ली- सत्ता हातची गेल्यानंतर आपल्या पक्षाला किमान विरोधी पक्षनेतेपद तरी मिळावे म्हणून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सोनियांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून या प्रकरणात तत्काळ निर्णय घेण्याची विनंती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस खासदारांचा आकडा 44 असूनही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास अडचण नसावी. लोकसभेच्या 1977 मधील नियमावलीनुसार सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते. या पदासाठी सदस्यांच्या टक्केवारीचा लिखित नियम नसल्याच्या मुद्द्याकडे सोनियांनी लक्ष वेधले आहे.
अमेरिकेत खटला फेटाळला
न्यूयॉर्क- सोनिया गांधी यांच्यावर शीखविरोधी दंगल प्रकरणात शीख समूहाने दाखल केलेला खटला अमेरिकी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात सोनिया गांधी यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असे कोर्टाने सांगितले.