आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी देशात गप्प का? राहुल गांधींनी घेतला पंतप्रधानांचा समाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील हत्यांच्या घटनेवर काहीही बोलत नाहीत. परंतु परदेशात गेल्यावर मात्र बोलू लागतात. मग ते देशात का गप्प असतात, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी केला आहे. दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देशात दादरीसारख्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. सातत्याने हिंसाचार होत आहे. असहिष्णुता वाढू लागली आहे. परंतु त्यावर मोदींना काहीही बोलावेसे वाटले नाही. वास्तवात विकासाच्या आडून मोदी आपला जातीय अजेंडा राबवण्याचे काम करत आहेत, अशा शब्दांत सोनियांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांचे वागणे पूर्णपणे हुकूमशहासारखे आहे. इतरांचा आवाज, मत ऐकून घेतले जात नाही. लोकशाहीत या गोष्टींना काहीही थारा नाही. त्यांच्याकडे देशभक्तीदेखील नाही. ते केवळ हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. नेहरूजींनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. परंतु मोदी जागतिक व्यासपीठावरून सातत्याने खोट्या गोष्टी सांगू लागले आहेत. त्यामुळे विकासाच्या महान परंपरेला धक्का बसला आहे.

परदेशात वेगळेच
परदेश दौऱ्यावर असताना मोदी देशाची आेळख सहिष्णू अशी सांगतात. प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगतात. परंतु देशात असतात त्या वेळी ते गप्प का असतात ? हरियाणात दलित मुलाची हत्या झाली तेव्हा पंतप्रधानांनी मौन बाळगले. दादरीतील घटनेवरही ते काहीही बाेलले नाहीत, असे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

पंडित नेहरूंच्या विचारसरणीला छेद
मोदी सरकारने नेहरूंच्या विचारसरणीला छेद दिला आहे. नेहरू आपल्या विरोधकांचे म्हणणेदेखील एेकून घेत असत. मात्र मोदी यांना संसदेच्या कामकाजात काहीही रस नाही. म्हणूनच विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नावर त्यांनी अद्याप योग्य असा प्रतिसाद दिलेला नाही, असा हल्लाही राहुल यांनी जयंतीच्या निमित्ताने केला.

संघालाही लक्ष्य
नेहरूंसारखे स्वातंत्र्ययोद्धे जेव्हा मातृभूमीसाठी लढत होते, त्या वेळी काही लोक आपल्या घरात सुरक्षितपणे दडून बसलेले होते. त्याच वेळी काही ब्रिटिशांचे गोडवे गाड होते. परंतु त्यांच्यापैकी कोणीही त्या वेळी प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामात लढले नाहीत, असा टोला सोनियांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता लगावला.
बातम्या आणखी आहेत...