नवी दिल्ली - लोकसभेत विविध पक्षांना दिल्या जाणा-या जागेच्या वाटपाची केंद्र सरकारची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. पण या मुद्यावरून पुन्हा नाराजी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसला विरोधी पक्षांच्या बाकावर पहिल्या रांगेत सध्या दोन जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. पण काँग्रेसने आणखी दोन जागांची मागणी केली आहे. सरकारने हे मान्य केल्यास सरकारला पहिल्या रांगेतील त्यांच्या जागांचा बळी द्यावा लागण्याची शक्यता आहे.
सुत्रांच्या मते केवळ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाच सध्या पहिल्या रांगेत जागा देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव तसेच माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांच्या पहिल्या रांगेतली जागेचा प्रश्नही सरकारसमोर उभा राहिला आहे. या दोन्ही पक्षांच्या खासदारांची संख्या अत्यंत कमी असल्याने त्यांना पहिल्या रांगेत जागा देण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने जर त्यांना पहिल्या रांगेतील जागा दिल्या तर सरकारला पुन्हा सर्व बैठक व्यवस्था नव्याने ठरवावी लागणार आहे.
या जागांच्या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नसल्याने सरकारने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांची शनिवारी बैठक बोलावली आहे. सात जुलैला अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने, त्याच्या दोन दिवसांपूर्वी बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.
सत्ताधारी पक्षांच्या बाजुची बैठक व्यवस्था मात्र जवळपास निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभापतींच्या उजव्या बाजुने पहिल्या क्रमांकाच्या जागेवर बसतील. त्यांच्यानंतर दुस-या जागेवर केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह हे असतील. सिंग यांच्यानंतर म्हणजे तिसरी जागा ही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची तर चौथी जागा पक्षाचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण अडवाणी यांना असेल. अडवाणी हे मंत्री नसले तरी पहिल्या रांगेतील ज्येष्ठ सदस्यांमध्ये त्यांचा समावेश असेल.
त्याशिवाय पहिल्या रांगेत बसणा-यांमध्ये एनडीएच्या घटकपक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. यात रेल्वेमंत्री सदानंद गौडा, रसायन व खते मंत्री अनंत कुमार त्यानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गणपती राजू, अन्न व पुरवठा मंत्री रामविलास पासवान आणि अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांचाही समावेश असेल. मधल्या भागात एआयएडीएमके, तृणमूल काँग्रेस आणि बीजेडीचे खासदार पहिल्या रांगेत असतील. त्यांना जागांच्या प्रमाणात स्थान मिळेल.
सत्ताधारी एनडीएच्या वाट्याला सध्या पहिल्या रांगेतील 12 जागा आहेत. त्यामुळे आणखी दोघांचा या पहिल्या रांगेमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोळी आणि शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रिय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण जर सरकारला देवेगौडा आणि मुलायमसिंह यांच्याबाबत विचार करायचा असेल, तर त्यांना नव्याने रचना ठरवावी लागले.
फाईल फोटो - सो. लोकसभा