आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून - काठमांडूच्या थमेल आणि लुकलामध्ये पर्यटकांची तोबा गर्दी. रांगेत शेरपांची दुकाने. ब्रिटिश, अमेरिकी आणि नेपाळी टूर कंपन्यांचे एजंट्स. भावावरून घासाघीस, सूट. पहिला हंगाम संपलेला आहे. सप्टेंबरमध्ये सुरू होणारा नवीन हंगाम आणि पुढील दोन वर्षांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. ही काही एखाद्या सर्वसाधारण पर्वताच्या सफरीची तयारी नव्हे, हा एव्हरेस्टवरील चढाईसाठी थाटलेला बाजार आहे. जर तुमच्या खिशात लाखो रुपये असतील, तर जगातील सर्वात उंच पर्वतावर पाऊल ठेवणे काहीच अवघड नाही.
अॅडव्हेंचर या अमेरिकी टूर ऑपरेटर कंपनीने प्रतिस्पर्धींवर मात करण्यासाठी आपले भाव 60 हजार डॉलरहून 45 हजार डॉलरवर आणले. भाव करा आणि एव्हरेस्टच्या दिशेने पाऊल टाका, असाच एकूण मामला. वय कमी असो की जास्त, कुणी आजारी असो की दुर्बल त्यामुळे काहीच बिघडत नाही. तुमच्या खिशात पैसा खुळखुळला पाहिजे, एवढीच अट. एव्हरेस्ट चढाईचे ताजे विक्रम आहेत.
16 तासांत एव्हरेस्टवर पोहोचणे. 22 वेळा चढाई करणे. 15 वर्षांपासून ते 76 वर्षांपर्यंतचे एव्हरेस्ट विजेते.
खिशाच्या सामर्थ्याने एव्हरेस्ट सर्वांच्या सहज आवाक्यात आणले आहे. साठ वर्षांपूर्वी तेनजिन नोर्गे आणि एडमंड हिलरी सर्वात आधी 29 हजार फूट उंचीच्या ज्या टेकड्यांवर पोहोचले होते, तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य उभारलेल्या हिलरी टॉपपर्यंत पाय-या बांधण्याचा विचार होऊ लागला आहे. लुकला बेस कॅम्पवरील गर्दी कमी करणे हा त्यामागचा उद्देश. बाजारूपणामुळे एव्हरेस्टचा रोमांच संपुष्टात आला आहे. आता ते पिकनिक आणि पर्यटन केंद्र बनले आहे. खरे तर एव्हरेस्टने स्वत:च धाडसी विजेत्यांची निवड करायला हवी होती. मात्र, आता शेरपा, शिफारशी आणि आधार घेऊन कोणीही रेंगाळत या शिखरावर चढाई करू लागला आहे, असे प्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘द लास्ट हाऊस ऑन एव्हरेस्ट’ या पुस्तकाचे लेखक ग्रॅहम होएलॅड सांगतात. काठमांडूतील स्वामी संपूर्णानंद योगाच्या बळावर अनवाणी पायांनी एव्हरेस्टवर चढाई करणार आहेत, तर जपानचे एक 80 वर्षीय गृहस्थ चारवेळा हृदय शस्त्रक्रिया होऊनही दोनवेळा एव्हरेस्टवर जाऊन आले आहेत. आता ते तिस-यांदा आपले कसब दाखवायला सज्ज झाले आहेत. 1990 मध्ये एव्हरेस्ट चढाईचे 18 टक्के प्रयत्न यशस्वी झाले आहेत. 2012-13 मध्ये हा आकडा 58 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. 1983 मध्ये केवळ 8 लोकच या शिखरावर जाऊ शकले होते.
स्वर्गाचे दार नावाने प्रसिद्ध असलेल्या या शिखरावरचे राजकारणही तितकेच उंच आहे. गिर्यारोहक आणि शेरपांमधील संघर्ष नेहमीचाच आहे. शिखरावर कोण पाऊल ठेवणार आणि कोण नाही, हे गिर्यारोहकाच्या वजनदारपणावरून ठरते. तुम्ही जर टीम लीडरच्या जवळचे आहात आणि शेरपांना खुश करण्यासाठी खिशात पैसे असतील, तर तुमचे शारीरिक दौर्बल्यही दुर्लक्षित केले जाते. शेरपा तुम्हाला खांद्यावर घेऊन शिखर सर करून दाखवतील. 8 मे 1984 रोजी एव्हरेस्ट सर करणा-या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक दलाच्या सदस्या चंद्रप्रभा एतवाल यांना त्या पहिल्या महिला गिर्यारोहक ठरू नयेत म्हणून तीन कॅम्पनंतर शेवटच्या कॅम्पला जाण्यास त्यांना रोखण्यात आले होते. तशी लेखी तक्रारच त्यांनी भारतीय गिर्यारोहण परिषदेकडे केली आहे. 29 मे 1953 रोजी एव्हरेस्टवर पाऊल ठेवणा-या तेनजिन आणि हिलरीबाबतही एव्हरेस्टवर पहिल्यांदा पाऊल कुणी ठेवले, हाच वाद आहे. गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट हे अंतिम सत्य आहे, हे खरे असले तरी बाजारू वृत्तीच्या पर्वत पर्यटनामुळे या उत्तुंग शिखराचे महत्त्वच बदलून टाकले आहे. प्रत्येक वर्षी धाडसाचे नव्हे तर संख्येचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. पर्यटकांनी शेरपा, शिफारशी व आधारावर रेंगाळत एव्हरेस्ट सर करून त्याचा अपमान करू नये, असे 1978 मध्ये विनाऑक्सिजन एव्हरेस्ट सर करणारे ऑस्ट्रियाचे गिर्यारोहक पीटर हैबर यांचे म्हणणे आहे.
पैशांच्या बळावर आव्हान तोकडे
एव्हरेस्ट चढाईसाठी हवेत कमीत कमी 30 लाख रुपये
> परवाना शुल्क6
> मुख्य मार्गदर्शकाचे मानधन11.5
> सहायक मार्गदर्शकाचे मानधन4.5
> कचरा उचलण्याची हमी ठेव1.8
> उपकरण खर्च3.6
> अन्य खर्च2
(आकडे लाखांत)
36 लाखांत लक्झरी सुविधा
@स्टिरिओ सिस्टिम
@फ्लॅट स्क्रीन टीव्ही
@डीव्हीडी प्लेअर
@एस्प्रेसो कॉफी
@आवडीचे जेवण
@आणि दारूही
दर आठवड्याला नव्या विक्रमाची नोंद
@15 वर्षांचा शेरपा टेंबा सेरी, तर 76 वर्षांचे मीन बहादूर यांनी सर केले सर्वात उंच शिखर
भाग्यश्री सावंत
18 वर्षांच्या वयात अनुभव नसताना एव्हरेस्टवर चढाई
2010-2011 मध्ये दोनदा परवानगी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.