आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Convicted MPs, MLAs Will Retain Seats With No Voting Rights

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारांना निवडणूक लढविण्यास केंद्र सरकारने खुला केला रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कलंकित खासदार, आमदारांना वाचवण्यासाठी सरकारने मार्ग काढला आहे. आता दोषी खासदार आणि आमदारांची खुर्ची शाबूत राहील आणि ते तुरुंगातून निवडणूकही लढवू शकतील. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. परंतु सरकारने लोकप्रतिनिधी कायद्यातच बदल करून टाकला. या दुरुस्तीवर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तबही करून टाकले.

पुढील आठवड्यात संसदेतही हा बदल पारित केला जाऊ शकतो. कारण सर्वच पक्षांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध होता. न्यायालयाने हा निकाल 10 आणि 11 जुलै रोजी दिला होता. त्याच दिवसापासून तो लागूही केला होता. त्यामुळे कायद्यातील दुरुस्तीही 10 जुलैपासूनच लागू होईल, असे सरकारने ठरवले आहे. याचाच अर्थ पूर्वलक्षी प्रभावाने हा बदल लागू होणार आहे.

सरकारने असा फिरवला निर्णय

1. खासदार, आमदाराला शिक्षा झाली आणि 90 दिवसांत निर्णयाला आव्हान देऊन स्थगिती मिळवल्यास अपात्र ठरणार नाही.
यासाठी कायद्यातील कलम 8चे पोटकलम 4 मध्ये बदल करण्यात आला.
2. तुरुंगातून निवडणूक लढवता येईल. तुरुंगवासात नाव मतदार यादीत राहते. मतदानाचा अधिकार नसतो.
यासाठी कायद्यातील कलम 62च्या पोटकलम 2 मध्ये बदल करण्यात आला.

परंतु 2 अटीदेखील
1. शिक्षा झाल्यानंतरही सदस्यत्व कायम राहील. सभागृहात जाऊ शकेल. परंतु कामकाजात मतदानाचा अधिकार नसेल.
2. शिक्षापात्र सदस्याला अपिलानंतर अंतिम निर्णय लागेपर्यंत वेतन व भत्ते घेण्याचा अधिकार नसेल.

आधी असे होत होते
शिक्षेनंतर खासदार, आमदार वरच्या न्यायालयात आव्हान देत होते. सदस्यत्व कायम राहत होते. सभागृहातील कामकाजात भागही घेत होते. निकाल येण्याआधी निवडणूका येत होत्या. लालू यादव याचे उदाहरण आहेत. चारा घोटाळा प्रकरण 19 वर्षांपासून सुरू आहे. अद्याप निकाल लागलेला नाही.

आता काय होणार
जवळपास सर्वच पक्ष या बाजूने आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंजुरीनंतर कायद्यात बदलाचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पावसाळी अधिवेशनात हा बदल मांडला जाईल आणि पारितही होईल अशीही शक्यता आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर न्यायालयाचा निर्णय आपोआप रद्दबातल ठरेल.