आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corrupt Judge Charge: Katju Poses Six Questions To Ex Chief Justice Of India

काटजूंचे पुन्हा प्रश्नास्त्र माजी सरन्यायाधीश लाहोटी यांना विचारले सहा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यूपीए सरकारच्या काळात अयोग्य तडजोडी करून एका भ्रष्ट न्यायाधीशाला मद्रास उच्च न्यायालयात बढती देऊन त्याला मुदतवाढ दिल्याचा आरोप करणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी आता या प्रकरणी माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी यांना थेट सहा प्रश्न विचारले.

न्या. वाय. के. सबरवाल, न्या. आर. सी. लाहोटी, न्या. के. जी. बालसुब्रह्मण्यम या तीन माजी सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात हा प्रकार घडल्याचा आरोप काटजूंनी केला होता. त्यावरून राजकीय आणि न्यायपालिकेत भूकंप आलेला असतानाच काटजू यांनी मंगळवारी पुन्हा याच विषयावर न्या. लाहोटी यांना ब्लॉगवरून काही प्रश्न विचारले आहेत.

उत्तरे द्या, सांगा हे खोटे आहे का?
1 मद्रास हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायाधीशाविरुद्ध असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मी एक पत्र लिहिले होते. यानंतर लाहोटी यांनी गुप्तचर विभागामार्फत (आयबी) चौकशी केली. यासाठी मी न्या. लाहोटी यांची व्यक्तिश: भेटही घेतली होती. हे सत्य नाही काय?

2 माझ्या सूचनेवरूनच न्यायमूर्ती लाहोटी यांनी त्या भ्रष्ट न्यायाधीशाची गुप्तचर विभागामार्फत चौकशी केली, हे खोटे आहे का?

3 मी न्या. लाहोटींची राजधानी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला चेन्नईला फोन करून सांगितले होते की, त्या न्यायाधीशाविरुद्ध आलेल्या तक्रारींत बरेच तथ्य आहे. हे न्या. लाहोटी नाकारणार काय?

4 त्या न्यायाधीशांविरुद्ध आयबीचा अहवाल मिळाल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश लाहोटी यांनी तीन न्यायमूर्तींची बैठक बोलावली होती. या अहवालाच्या आधारे तिन्ही न्यायमूर्तींनी मद्रास हायकोर्टाच्या वादग्रस्त न्यायमूर्तींना मुदतवाढ द्यावयाची नाही, असा निर्णय घेतला होता. हे खोटे आहे का?

5 कॉलेजियमने विरोध करूनही लाहोटींनी त्या न्यायामूर्तींना एक वर्षाची मुदतवाढ देण्याची शिफारस केली होती. हे असत्य आहे का?

6 गुप्तचर विभागाच्या चौकशीत हे न्यायाधीश दोषी आढळले असतानाही न्यायमूर्ती लाहोटी यांनी या अतिरिक्त न्यायाधीशांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याची शिफारस सरकारकडे का केली?