आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथित बनावट पदवीप्रकरणी स्मृती इराणींवर खटला चालवण्यास परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कथित बनावट पदवीप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास दिल्लीतील पतियाळा कोर्टाने परवानगी दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आदमी पार्टीचे माजी मंत्री जितेंद्रसिंग ताेमर बनावट पदवी प्रकरणात अडकले असताना याच धर्तीवर इराणी यांच्यावरील खटला चालवण्यास परवानगी मिळाल्याने भाजप गोटात प्रचंड अस्वस्थता आहे.

२००४ च्या निवडणुकीतील शपथपत्रात इराणी यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए केल्याची माहिती दिली होती. दहा वर्षांपूर्वीची माहिती आता ग्राह्य धरता येईल का? हाच मुद्दा न्यायालयासमोर होता. परंतु १० वर्षांपूर्वी शपथपत्रात दिलेली माहिती ग्राह्य धरता येऊ शकते, यावर शिक्कामाेर्तब करत स्मृती इराणी यांच्या बनावट पदवीप्रकरणी खटला चालवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. २८ तारखेच्या सुनावणीमध्ये तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर इराणी यांना समन्स पाठवले जाऊ शकते. इराणी यांनी िनवडणूक आयाेगाकडे चुकीची माहिती दिल्याची तक्रार अहमद खान यांनी केली हाेती. खान यांनीच इराणी यांच्याविराेधात न्यायालयाकडे धाव घेतली आहे.

वेगवेगळी शपथपत्रे
इराणी यांनी राज्यसभा आणि लाेकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना शपथपत्रात वेगवेगळी माहिती दिली असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. इराणी यांच्या तीन शपथपत्रांपैकी एक योग्य असावे हे स्पष्ट होते. २१ जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष हा मुद्दा संसदेत उपस्थित करू शकतात. इराणी यांनी २००४ मध्ये निवडणुकीचा अर्ज सादर करताना १९९६ मध्ये िदल्ली विद्यापीठाकडून मिळालेल्या बीएच्या पदवीचा उल्लेख केला हाेता, तर २०११ मध्ये बीकाॅम प्रथम वर्ष शैक्षणिक पात्रता असल्याचे नमूद केले हाेते.

अहमद खान यांच्या वकिलाचा युक्तिवाद
अहमद खान यांचे वकील के. के. मेनन यांनी न्यायालयाला सांगितले की, एप्रिल २००४ मध्ये लाेकसभा निवडणुकीवेळी दाखल प्रतिज्ञापत्रात स्मृती यांनी १९९६ मध्ये दिल्ली विद्यापीठातून दूरस्थ शिक्षणाद्वारे बीए केल्याचे नमूद केले. ११ जुलै २०११ रोजी गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढण्यासाठी दाखल प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च शैक्षणिक पात्रता दूरस्थ शिक्षणाद्वारे बीकॉम पार्ट वन केल्याचे सांगितले. यानंतर १६ एप्रिल २०१४ रोजी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी दाखल प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिल्ली विद्यापीठात दूरस्थ शिक्षणाद्वारे बीकॉम प्रथम वर्ष केल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधानही लक्ष्य
पंतप्रधान मोदी यांनी स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पक्ष प्रवक्ते शकील अहमद म्हणाले, इराणी राजीनामा देणार नसतील तर पंतप्रधानांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढावे. दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्र तोमर यांच्याप्रमाणेच इराणींविरुद्ध खटला चालवावा. आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष राजीनाम्याची मागणी करत म्हणाले, पंतप्रधान भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही, असे म्हणतात. कायदा सर्वांना समान आहे. दोन वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा निकष काेणत्याही स्थितीत असू शकत नाही.

स्वामींकडून पाठराखण
भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी स्मृती इराणी यांची पाठराखण केली. इराणी यांना अद्याप न्यायालयाचे समन्स आलेले नाही. त्यामुळे सध्या तरी त्या उत्तरदायी नाहीत. त्यांच्याविरोधात प्रकरण दाखल होऊ शकते, हे अद्याप तरी तक्रारदाराला सिद्ध करता आलेले नाही, याकडे स्वामी यांनी लक्ष वेधले.