आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Denies Alimony To Woman, Says She's Capable Of Working

अर्थार्जनास सक्षम महिलेला पोटगी नाही;दिल्ली कोर्टाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काम करून अर्थार्जन करण्यास सक्षम असलेल्या आणि मूलबाळ नसलेल्या महिलेला घटस्फोटानंतर पोटगी देण्यास दिल्ली सत्रन्यायालयाने नकार दिला आहे. दिल्लीत राहणार्‍या एका महिलेने घटस्फोटानंतर पतीकडून पोटगी मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल होती. मात्र, संबंधित महिलेला एकही अपत्य नाही, तसेच पतीप्रमाणेच पत्नीदेखील स्वत:पुरते पैसे कमावण्यास सक्षम असल्यामुळे तिची पोटगी मिळण्याबाबतची याचिकाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुराधा शुक्ला यांनी रद्द केली आहे.

खालच्या न्यायालयाने पोटगी नाकारल्यानंतर या महिलेने दिल्ली सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. पती आणि पत्नी दोघांचेही सारखे शिक्षण झाले असल्यास दोघेही आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा निर्वाळा कोर्टाने केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या इतर निकालांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश म्हणाले की, ‘अशा प्रकरणी संबंधित पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी किंवा त्यासाठी पात्र असल्यास घटस्फोटानंतरचे जीवन जगण्यास ती आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून नाही. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयात काहीही चूक नाही.’

लग्नापूर्वी दिल्लीत फॅशन इन्स्टिट्यूटचा छोटा उद्योग करत असल्याचे संबंधित महिलेने कनिष्ठ न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे घटस्फोटानंतरचेही आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीपणे जगण्यास ती सर्मथ असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.