नवी दिल्ली - बंद पडलेल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ची मालमत्ता हडपल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सहा नेत्यांविरुद्ध दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने समन्स बजावले आहे. 7 ऑगस्टपर्यंत या नेत्यांना कोर्टात हजर राहावयाचा आहे.
उत्तर प्रदेश व दिल्लीत नॅशनल हेरॉल्डची 2 हजार कोटींची मालमत्ता आहे. ती ‘यंग इंडियन’ कंपनीच्या माध्यमातून हडप करण्यात येत असल्याची तक्रार भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही तक्रार अर्ज दाखल केला होता. यावर महानगर दंडाधिकारी मोमती मनोचा यांनी संबंधित नेत्यांना समन्स बजावले.
काँग्रेस नेत्यांनी बनाव करून नॅशनल हेरॉल्डची मालमत्ता हडपल्याचा आरोप तक्रारीत आहे. आता सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरा, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि यंग इंडियन कंपनीच्या सर्व संचालकांना आता 7 ऑ गस्टला कोर्टात हजर राहावे लागेल.
काँग्रेस हायकोर्टात जाणार : दंडाधिकार्यांनी बजावलेल्या समन्सला काँग्रेसच्या वतीने हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिले.
आरोप काय?
1. नॅशनल हेरॉल्डच्या प्रकाशन कंपनीला काँग्रेसने 2008 मध्ये 90.27 कोटींचे कर्ज दिले. राजकीय पक्ष असे कर्ज देऊ शकत नाही.
2. 23 नोव्हेंबर 2010 रोजी कंपनी कायद्यानुसार यंग इंडियन कंपनी स्थापन करण्यात आली. यात सोनिया-राहुल यांची प्रत्येकी 38 टक्के भागीदारी आहे. या कंपनीच्या माध्यमातून हेरॉल्डच्या मालमत्तेचे व वसुलीचे व्यवहार करण्यात आले.
शिक्षा काय होऊ शकते?
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे लोक दोषी ठरले तर सात वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा या नेत्यांना होऊ शकते.