नवी दिल्ली - फोन चोरून त्याची ऑनलाइन विक्री करणे सराईत चोरांना महागात पडले. या चोरांनी ज्या व्यक्तीचा फोन चोरला, त्यालाच पुन्हा ऑनलाइन साइटवर विकला. त्यामुळे चोराची तत्काळ पोलखोल झाली. या प्रकरणी इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये एका एटीएम सेंटरवर पतियाळा येथील रहिवासी कुशाल बंसल हे आयफोन विसरून गेले. दक्षिण दिल्लीतील रहिवासी रजत कांत आणि महेश कुमार यांनी हा फोन चोरला. बंसल पुन्हा एटीएमवर आले, तेव्हा फोन सापडला नाही. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. रजत व महेशने फोन विकण्यासाठी एका वेबसाइटची मदत घेतली. योगायोगाने त्याच वेबसाइटवर कुशाल सिंह सेकंडहँड मोबाइल शोधत होते. हा फोन आवडल्यावर त्यांनी विक्रेत्याशी संपर्क साधला. 38 हजार रुपयांत करार झाला. मात्र फोनसोबत बिल न मिळाल्याने कुशाल यांनी फोन खरेदी करण्यास नकार दिला. दुस-या दिवशी पालिका बाजारात नकली बिल सादर केल्याने त्यांचे पितळ उघडे पडले.
त्यावर फोनचा आयएमईआय नंबर पाहिल्यावर कुशाल थक्क झाले. दोघांना बोलण्यात गुंतवून त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.