आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crises Of Telengana : Financial Assistance Provides To Simandhra

तेलंगणा पेच: संतप्त सीमांध्र भागासाठी आर्थिक पॅकेजचा उतारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशच्या विभाजनामुळे संतप्त झालेल्या सीमांध्र प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, तेलंगणा निर्मितीच्या निषेधार्थ गेल्या चार दिवसांपासून उपोषणास बसलेले तेलगू देसम नेते चंद्राबाबू नायडू यांना आंध्र भवनातून उचलून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी आंध्र भवनाबाहेर तेलगू देसम कार्यकर्ते व पोलिस यांच्यात सुमारे तासभर लठ्ठालठ्ठी झाली.
तेलंगणा निर्मितीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटाची शुक्रवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत सीमांध्र भागात अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली नवी राजधानी उभारण्यासाठी खास पॅकेज देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मात्र कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार नाही याबाबत केंद्र सरकार ठाम आहे. हैदराबादला केंद्रशासित प्रदेश केल्यास तेलंगणा प्रदेशात नवीच समस्या उभी राहील अशी शक्यता असल्याने सीमांध्र भागासाठी नवी राजधानी निर्माण करण्यास मदत क रण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


आंध्र भवनात गोंधळ
आंध्र भवनात बेमुदत उपोषणास बसलेल्या चंद्राबाबूंना बळजबरीनेच पोलिसांनी राममनोहर लोहिया रुग्णालयात उचलून नेले. या वेळी तेलगू देसम कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. चंद्राबाबूंना रुग्णालयात भरती करण्यासाठी 50 पोलिसांचा ताफा आला होता. व्यासपीठावरून चंद्राबाबूंना नेण्यासाठी पोलिस येताच कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जोरदार घोषणाबाजी करून त्यांनी पोलिसांची अ‍ॅम्ब्युलन्स रोखून धरली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत त्यांचे पुतळे जाळण्यात आले. अखेर कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढीत चंद्राबाबूंना रुग्णालयात नेण्यात आले.


काँग्रेस नेत्यांवर रेड्डी संतापले
परस्पर वक्तव्ये करणा-या काँग्रेस नेत्यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी चांगलेच खडसावले. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे आंध्र प्रदेशचे प्रभारी असलेल्या दिग्विजय यांनी विभाजनाचे विधेयक दोन वेळा विधानसभेकडे पाठवले जाईल असे म्हटले होते, तर शिंदे यांनी केवळ मते जाणून घेण्यासाठी ‘विधेयकाचा मसुदा’ पाठवला जाईल, असे वक्तव्य केले होते.


तेल, पाणी, कोळसा वाटप
स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर नैसर्गिक स्रोतांचे दोन्ही राज्यांत वाटप करण्याबाबत मंत्रिगट विचारविनिमय करणार आहे. कोळसा, पाणी, तेल, वायू, संपत्ती यांचे वाटप करण्यासोबतच पोलावरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रिगट आंध्र प्रदेशला भेट देणार नाही.


सचिवालय कर्मचारी संप मागे
आंध्र प्रदेश सचिवालयातील सीमांध्र भागाच्या कर्मचा-यांनी गेल्या महिनाभर सुरू असलेला संप मागे घेतला. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्यासोबत झालेली बोलणी ‘फलदायी’ ठरल्याने संप मागे घेत असल्याचे सीमांध्र कर्मचारी फोरमने म्हटले आहे. सीमांध्र भागाचे कर्मचारी गेल्या 38 दिवसांपासून संपावर होते.


वीज कर्मचारी कामावर
विजयवाडा व कडप्पा जिल्ह्यातील दोन थर्मल पॉवर केंद्रातून शुक्रवारी वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. फालीन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रची किनारपट्टी आणि रायलसीमा भागातील कर्मचा-यांनी आपला बेमुदत संप ‘तात्पुरता’ स्थगित केला असल्याचे जाहीर केले आहे. तेलंगणा निर्मितीच्या घोषणेनंतर गेल्या पाच दिवसांपासून वीज कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते.