नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारत विरोधी घोषणा दिल्याच्या आरोपात अटक असलेल्या उमर खालिद व अनिर्बन भट्टायार्च या दोन विद्यार्थ्यांच्या जामिनाबाबत आज पतियाला हाऊस कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. शुक्रवारी, 18 मार्च रोजी कोर्ट यांच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. तोपर्यंत उमर आणि अनिर्बन यांना कोठडीमध्ये राहावे लागणार आहे.
कोर्टात काय केली मागणी..
उमर आणि अनिर्बन यांनी कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात मागणी केली आहे की, तपास यंत्रणांना आमच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, शिवाय या प्रकरणात कन्हैय्याकुमारला देण्यात आलेल्या जामिनाचा आधार मानून आम्हालाही जामीन मंजूर करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली. आज त्यांच्या अर्जावर सुनावली झाली तेव्हा दिल्ली पोलिसांनी जामिनास विरोध केला आहे.
कोर्टात काय सांगितले..
- उमर आणि अनिर्बन यांनी कोर्टात आपली बाजू मांडली आहे.
- जेएनयूमध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामागे चिथावणी देण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असे ते म्हणाले.
- हे प्रकरण कोणतेही कारण नसताना वाढवले जात आहे, असे त्यांनी कोर्टात सांगितले.
- देशद्रोहाच्या गुन्हात मोडणारे कोणतेही कृत्य आम्ही केले नाही, असे या दोघांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला.