आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे तेल सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर, पिंपामागे ४० डॉलरखाली येण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्या वर्षातही कच्च्या तेलातील घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत. कच्चे तेल सध्या सहा वर्षांच्या नीचांकावर आहे. कच्च्या तेलाचे वाढते उत्पादन, मागणीत घट, अमेरिकेतील शेल गॅसचे उत्पादन विक्रमी स्तरावर पोहोचणे या कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यंदाही कच्च्या तेलाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरूच राहील, ब्रेंट क्रूडच्या किमती पिंपामागे ४० डॉलरच्या खाली राहण्याची शक्यता आहे.

तर देशातील बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ३००० रुपयांपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे. नोमॅक्स बाजारात क्रूड तेलाचा भाव पिंपामागे ४८ डॉलरच्या खाली आहे, तर ब्रेंट क्रूड तेल पिंपामागे ५१ डॉलरच्या नजीक पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम देशातील बाजारातही दिसून आला. एमसीएक्समध्ये क्रूड तेलाच्या जानेवारीच्या वायदा किमती ०.७५ टक्क्यांहून जास्त घसरल्या आहेत. सध्या कच्चे तेल पिंपामागे ३०४६ रुपयांखाली आले आहे. अमेरिकेने कच्च्या तेलाची निर्यात ४० वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

घसरणीची कारणे
* जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा जास्त झाल्याने किमतीत घट
* कच्च्या तेलाचे मोठे ग्राहक असणाऱ्या देशात आर्थिक मरगळीमुळे मागणीत सातत्याने घट
* अमेरिकेत शेल गॅसचे उत्पादन तीन दशकांच्या उच्चांकावर
* रशियात व्याजदर वाढल्याने रुबल चलनाची मोठी घसरण झाली. त्यामुळे तेल आणखी स्वस्त झाले.
* अमेरिकेत हवामान सामान्य राहिल्याने क्रूड व नैसर्गिक वायूची मागणी घटली आहे.

देशातील बाजारात किमती पिंपामागे ३००० रुपये
एसएमसी कमोडिटीचे रवी सिंह यांच्या मते कच्च्या तेलातील घसरण सुरूच राहील. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच राहील. रवी यांच्या मते, प्रत्येक तेजीच्या काळात विक्री केल्यास गुंतवणूकदारांचा फायदा होईल. देशातील बाजारात कच्चे तेल पिंपामागे ३००० रुपयांपर्यंत घसरू शकते, तर ब्रेंट क्रूडच्या किमती पिंपामागे ५० डॉलरच्या खाली येण्याची शक्यता आहे. नाेमॅक्स क्रूडच्या किमती ४५ डॉलरची पातळी सोडण्याची शक्यता आहे. एंजल कमोडिटीचे अनुज गुप्ता यांच्या मते, कच्च्या तेलातील घसरण आता थांबण्याची शक्यता नाही. पुरवठा तर जास्त आहेच, शिवाय अमेरिकेतील खराब आर्थिक आकडेवारीनेही किमतींवर दबाव आणला आहे. याशिवाय इराकनेही क्रूडची निर्यात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनुज यांच्या मते एमसीएक्समध्ये कच्चे तेल पिंपामागे ३१५० रुपयांपर्यंत घसरू शकते. तर नोमॅक्समध्ये ४८ डॉलर आणि ब्रेंट ५० डॉलरपर्यंत घटून व्यवहार करताना दिसून येईल.

इराक करणार दुप्पट निर्यात
ओपेक संघटनेचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक इराकनेही जास्त क्रूड निर्यातीची योजना बनवली आहे. इराकच्या तेल मंत्र्यांच्या मते, जानेवारीत क्रूड निर्यात वाढून ३३ लाख पिंप प्रतिदिन करण्यात येणार आहे. सध्या दररोज २९ लाख पिंपांची निर्यात केली जाते. तेल तज्ज्ञांच्या मते इराकमध्ये आता जास्त क्रूडचे उत्पादन होईल.

ब्रेन्सटेनकडून दराच्या अंदाजात घट
या क्षेत्रातील दिग्गज फर्म ब्रेन्सटेनने २०१५ साठीचा क्रूडबाबतचा अंदाज पिंपामागे १०४ डॉलरवरून घटवून ८० डॉलर केला आहे. २०१६ साठीचा अंदाज मात्र पिंपामागे ९० डॉलर आहे.

अमेरिकेतील आर्थिक वाढीच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह
शुक्रवारी अमेरिकेत जाहीर झालेली आर्थिक आकडेवारी अपेक्षेपेक्षा खूपच खराब आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेबाबत तज्ज्ञांनी अनेक प्रश्न उभे केले आहेत. आयएसएम मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयच्या खराब आकडेवारीनेही बाजारात घसरण आहे. दर महिन्याला येणारा आयएसएम मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५८.७ वरून घटून ५५.५ झाला आहे.