आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील कला संस्थांना 8.75 कोटींचे अनुदान; श्रीपाद नाईक यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सांस्कृतिक विभागातर्फे रंगभूमी अनुदान योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती योजना, कलाकारांना निवृत्तिवेतन आणि कल्याणनिधी योजनांसाठी 2011-12 ते 2014-15 या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील रंगभूमीशी संबंधित 212 संस्थांना 8.75कोटी रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले आहे. देशभरातील अशा 3 हजार 903 संस्थांना 136 कोटी 99 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत दिली.

कलाक्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारांना आर्थिक साहाय्य देणार्‍या योजनेअंतर्गत आणि रंगभूमीवरील युवा कलाकारांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीअंतर्गत 2011-12 या वर्षी 14 लाख 40 हजार रुपये आणि 2013-14 या वर्षी 2 लाख 40 हजारांचे अर्थसाहाय्य प्रदान करण्यात आले असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

या मंत्रालयांअंतर्गत कार्य करणारे राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) पारंपरिक रंगभूमीच्या विकासाच्या दृष्टीने अनेक पावले उचलत आहे. त्याअंतर्गत स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने देशभर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. एनएसडीच्या संस्कार रंगटोलीचा बाल संगम हा द्विवार्षिक कार्यक्रम असून त्या उत्सवाचा मुख्य उद्देश विविध कलांशी निगडित बाल कलाकारांद्वारे भारतीय नाट्यकला आणि पारंपरिक रंगभूमी कलांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आहे.

या व्यतिरिक्त ‘जश्न ए बचपन’ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. ईशान्येतील कलांसाठीही महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्ताने तेथील कलांची जपणूक आणि विकास होतो आहे. देशभरातील लोककला व पारंपरिक कलांना एसएनडी व्यासपीठ उपलब्ध करून देते. दरवर्षी भारत रंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येते. याव्यतिरिक्त रंगमंच कार्यक्रम, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते, असे नाईक यांनी सांगितले.