आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक शोषणाविरोधात सायकल फेरी, कन्याकुमारी ते काश्मीर मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बाल लैंगिक शोषणावर जनजागृती करण्यासाठी २० वर्षांच्या विद्यार्थ्याने बुधवारी कन्याकुमारी ते काश्मीर सायकल फेरीला सुरुवात केली. मुहंमद शाहिद असे त्याचे नाव असून तो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील भूगोल विषयाचा विद्यार्थी आहे. विद्यापीठ आणि मुलांच्या हक्कासाठी काम करणा-या संघटनांनी त्याला सायकल फेरीसाठी पाठबळ दिले आहे.
शाहिदने कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद केंद्रातून सायकल फेरीला सुरुवात केली. तो ११ राज्यांतील ९६ जिल्ह्यांतून प्रवास करत १२ जुलै रोजी काश्मीरला पोहोचण्याची शक्यता आहे. बाललैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन करत त्याने ४३ दिवसांची मोहीम आखली आहे. आपल्या प्रवासादरम्यान तो सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करणारे पॅाम्प्लेट्स वाटणार आहे. तो विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधणार आहे. मुलांनी शोषण सहन करू नये यासाठी ठिकठिकाणी पथनाट्यही सादर केली जाणार आहेत. एका नामांकित स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या दिल्ली दौ-यात शोषण झालेल्या काही मुलांच्या भेटी झाल्या. त्यानंतर या विषयात जनजागृती करण्याचे ठरवल्याचे शाहिदने सांगितले. लहानपणी मला शोषणाचा सामना करावा लागला.त्यामुळे अन्य कोणावर अशी वेळ येऊ नये,अशी माझी इच्छा आहे.

रोज ५० किमींचा सराव
केरळमधील कोझिकोडेचा रहिवासी असलेला शाहिद ९५ ते १०५ किमी प्रतिदिन प्रवासातून ४२०० किमी अंतर पूर्ण करणार आहे. ४३ दिवसांच्या या मोहिमेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून खडतर परिश्रम घेतले जात असल्याचे त्याने सांगितले. सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत दररोज ५० किमी सायकलिंग करत होतो. सरावामध्ये १०० किमीपर्यंत अंतर वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे शाहिदने सांगितले.

जामिया विद्यापीठाकडून सायकल
चॅरिटेबल फाउंडेशन ऑफ इंडिया, कोझिकोडेतील स्वयंसेवी संस्था आरसीएफआयने शाहिदला आर्थिक मदत केली असून जामिया मिलिया विद्यापीठाने सायकल प्रायोजित केली आहे.