नवी दिल्ली- विक्रमी तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असताना राजधानी दिल्लीत सात ते आठ तासांचे लोडशेडिंग सुरू असून प्रचंड वीज टंचाईमुळे दिल्लीकर संतप्त झाले आहेत. वीज तुटवड्यावर मात करण्यासाठी कें द्राने महाराष्ट्रातील दाभोळ प्रकल्पाचा गॅस दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी दिले.
वीज टंचाईमुळे जनतेचा रोष वाढत आहे. ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री गोयल, नायब राज्यपाल नजीब जंग, दिल्ली ट्रँस्को, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आणि ऊर्जा अधिकार्यांची मंगळवारी तातडीची बैठक झाली. ही बैठक अडीच तास चालली.
दिल्लीला दररोज 5 हजार 800 मेगावॅट विजेची गरज असताना सध्या 5300 मेगावॅट वीज उपलब्ध आहे. सुमारे 500 मेगावॅटचा तुटवडा आणि गेल्या महिन्यात झालेल्या वादळामुळे वितरण व्यवस्था कोलमडल्याने वीज टंचाईत भर पडली आहे. तुटलेल्या वीज तारांची येत्या 24 तासांत युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाणार असून 15 दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन गोयल यांनी बैठकीनंतर बोलताना दिले.
उपाययोजना
> बंद पडलेल्या दाभोळ वीज प्रकल्पाच्या गॅसपैकी 0.9 एमएमसीएमडी गॅस दिल्लीकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे 218 मेगावॅट वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे.
>दिल्लीतील वीज निर्मितीसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याचे आदेश सरकारी कंपनी गेलला देण्यात आले आहे.