आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक भास्कर डॉट कॉम वुमन प्राइड अवाॅर्ड २०१५ च्या विजेत्यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/नोएडा - संघर्षपूर्ण काळातही धैर्य बाळगण्याची प्रेरणा देणाऱ्या शेकडो कथांमधून दैनिक भास्कर डॉट कॉमच्या २०१५ च्या वुमन प्राइड अवाॅर्डसाठी तीन महिलांची निवड करण्यात आली आहे. शोभा डे, अनुष्का शर्मा आणि गुल पनाग या आमच्या परीक्षकांनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली. यात झारखंडमधील हजारीबागच्या नंदिनी चक्रवर्ती, राजस्थानमधील जोधपूरच्या अयोध्या कुमारी आणि गुजरातमधील अहमदाबादच्या दर्शिता बाबूभाई शहा यांचा समावेश आहे. जाणून घेऊया या तिघींच्या प्रेरणादायी संघर्षमय कथांबद्दल...
गरीब मुलांना शाळेसाठी नि:शुल्क सेवा देणाऱ्या नंदिनी
झारखंडच्या हजारीबागमध्ये राहणाऱ्या नंदिनी चक्रवर्ती कार चालवतात. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करतात. मात्र, गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांकडून त्या कोणत्याही प्रकारचे भाडे घेत नाहीत. शिवाय, ड्रायव्हिंगच्या कामातून सवड मिळेल तेव्हा त्या विद्यार्थ्यांना शिकवतातही. त्यांच्या कार्याचा अनेक एनजीओंनी सन्मान केला आहे. अर्थात, पुरुषी व्यवस्थेत आपले अस्तित्व आणि कर्तृत्व दाखवणाऱ्या नंदिनी यांना भास्करने वुमन प्राइड २०१५ पुरस्कारासाठी निवडले आहे.

अपंगांना स्वावलंबी बनवत आहेत अहमदाबादच्या दर्शिता
गुजरातमधील अहमदाबादच्या दर्शिता ५ विषयांत पदव्युत्तर पदवीधर आहेत. अपंग असूनही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले. आता त्या स्वत: इतर अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अपंग मानव मंडळाच्या माध्यमातून त्या स्वत:ची दर्शू केअर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. गरजू आणि अपंगांना रोजगारासाठी मोफत उपकरण आणि सामग्री देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात त्यांनी अनेक एनजीओंनाही सामील करून घेतले आहे. राष्ट्रपतींनीच्या हस्तेही त्यांचा गौरव झालेला आहे.

मुलींना सुशिक्षित करण्याचे जोधपूरच्या अयोध्याकुमारींचे स्वप्न
राजस्थानमधील जोधपूरच्या अयोध्याकुमारी गौर यांना बालपणी जास्त शिकता आले नाही. मात्र, आता त्यांनी स्वत:च शाळा उघडली आहे. विशेष म्हणजे, या शाळेत त्या विद्यार्थ्यांना आणि खास करून मुलींना नि:शुल्क शिक्षण देतात. वयाच्या चौदाव्या वर्षी अयोध्याकुमारी यांचे लग्न झाले. त्यांना भरपूर शिकायचे होते. अल्पवयात लग्न झाल्यामुळे त्यांना दहावीपर्यंतच शिकता आले. नंतर बीएडला शिकत असलेल्या त्यांच्या मुलीच्या मदतीने त्यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केले. प्रत्येक मुलीस शिक्षणाची संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. यामुळेच त्यांनी स्वत:ची शाळा उघडली.