आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'दाऊद, हाफिज पाकिस्तानातच; दोघांना भारताच्या हवाली करा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम व जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईद हे दोघेही पाकिस्तानमध्येच दडून बसले आहेत. शेजारील देशाच्या सरकारने दोघांचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.


दोन्ही आरोपी पाकिस्तानात दडून बसले आहेत. त्याबाबतची माहिती भारताकडे आहे. त्यामुळे त्यांचे भारताकडे प्रत्यार्पण करावे, असा आग्रह पाकिस्तानी सरकारकडे करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेत मंगळवारी दिली. दोन्ही आरोपी कराची किंवा देशातील इतर भागात दडून बसलेले असावेत, त्यांचा शोध घ्यावा, असे आपण पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना म्हटले आहे. सभागृहात भाजप नेते अनंतकुमार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी सरकारची भूमिका आणि सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्याअगोदर गृह राज्यमंत्री आर.पी.एन. सिंह यांनी यूपीए सरकारवर होत असलेल्या टीकेचा समाचार घेणारे भाषण केले.

दहशतवादाच्या पातळीवर काँग्रेसप्रणीत सरकार अपयशी ठरले आहे, असे चित्र विरोधकांकडून रंगवण्यात येत आहे, असा आरोप सिंह यांनी केला. त्यावरून दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमकीला जोरदार सुरुवात झाली. त्या वेळी कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकार आणि विरोधी पक्षातील सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उपस्थित प्रश्नावरील स्पष्टीकरण ऐकून घेण्याचे काम विरोधकांनी करायला हवे, असे पवार यांनी सांगितले.


स्वतंत्र राज्य निर्मितीची मागणी फेटाळली
अनेक नव्या राज्यांचे प्रस्ताव देशातून अनेक स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, हे प्रस्ताव सरकारकडून फेटाळून लावण्यात आले. बोडोलँड, गोरखालँड, विदर्भ, बुंदेलखंडसारख्या स्वतंत्र राज्यांची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर देशभरात त्यासाठी आंदोलन केले जात आहे. नवीन राज्यासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत. हे सर्व प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहेत. त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती गृह राज्यमंत्री आर.पी.एन. सिंह यांनी दिली. तेलंगणाच्या निर्मितीनंतर विविध राज्यांच्या मागणीला ऊत आला आहे.


‘दार्जिलिंगप्रश्नी केंद्राने हस्तक्षेप करावा’
कोलकाता । गोरखालँडवरून दार्जिलिंगचा प्रश्न चिघळत चालला आहे. त्यामध्ये आता केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि सामोपचाराने यातून तोडगा काढावा, अशी मागणी डाव्या पक्षांकडून करण्यात आली आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चा व केंद्र सरकार यांच्यातील चर्चेनंतर त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास लेफ्ट फ्रंटकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी दार्जिलिंगमधील चौक बाजार परिसरात पाच हजार विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली.