नवी दिल्ली - सोमालिया ते येमेनदरम्यान निघालेल्या बोटीवरील बॉम्बहल्ल्यानंतर चालक दलाच्या २० भारतीयांपैकी सात जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले. सौदी अरेबिया प्रणीत आघाडीच्या हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आहे. येमेनच्या होदीदाह बंदरावर झालेल्या हल्ल्यात जहाजाच्या चालक दलाचे १३ सदस्य बचावले असून सात बेपत्ता आहेत.
दजबोती येथील भारतीय वकिलातीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून दोन जहाजांपैकी एक बेरबेरा(सोमालिया) ते मोखा(येमेन) दरम्यान जात होती, अशी माहिती परराष्ट्र विभाग मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. ८ सप्टेंबर रोजी दुपारी या जहाजावर बॉम्बहल्ला झाला. त्यात १३ बचावले व सात जण बेपत्ता झाले. भारतीय नागरिकांची अद्याप ओळख पटली नाही.
वकिलातीतील अधिकारी स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहेत. जहाज मालकाशी चर्चा केल्यानंतर याबाबत अधिक माहिती कळू शकेल. मच्छीमारांच्या हवाल्याने काही प्रसारमाध्यमांनी मंगळवारी दिलेल्या वृत्तात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली फौजांच्या हवाई हल्ल्यात २० भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगितले हेाते. होदीदाह बंदरानजीक दोन जहाजांवर बाॅम्बहल्ला झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता.