आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद, केजरींविरोधात बदनामीचा खटला, दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांच्याविराेधात प्रत्येक अडीच कोटी रुपयांचा बदनामीचा दावा ठोकला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकेत डीडीसीने म्हटले अाहे की, दोन्ही नेत्यांनी भ्रष्टाचाराचे चुकीचे आरोप केल्यामुळे क्रिकेट संघटनेची प्रतिमा मलिन झाली आहे.
डीडीसीएचे उपाध्यक्ष रविंदर मनचंदा यांनी म्हटले की, डीडीसीएवर आर्थिक गैरव्यवहारांचे तसेच कनिष्ठ खेळाडूंच्या निवडीच्यावेळी गैरप्रकार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या या आरोपांमुळे क्रिकेट संस्थेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आम्ही संबंधितांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. वकील संग्राम पटनायक यांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे. डीडीसीएचे प्रभारी अध्यक्ष चेतन चौहान यांनी एका पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. तसेच त्यासाठी बदनामीचा खटला भरण्याचा इशारा दिला होता. याआधी अर्थमंत्री व डीडीसीएचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांनी केजरीवाल व त्यांच्या पक्षाच्या पाच नेत्यांवर दहा कोटी रुपयांच्या बदनामीचा खटला दाखल केला आहे.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहणार : कीर्ती
कोची | भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघातील (डीडीसीए) भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण लढतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डीडीसीएने दाखल केलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या मुद्द्यावर आपण पंतप्रधान मोदींचा वेळ मागितला आहे. त्यांच्या उत्तराची मी वाट बघत आहे. मला यावर बोलण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. या मुद्द्यावर भाजप लवकरच संसदीय पक्षाची बैठक बोलावणार आहे, याचा आपल्याला अानंद असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...