आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे, दोन हजाराच्या दोन प्रकारच्या नोटांवरून राज्यसभेत गदारोळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीनंतर आलेल्या पाचशे आणि दोन हजाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोटांवर काँग्रेस पक्षाने मंगळवारी राज्यसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय चलना बद्दलची विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

वरिष्ठ सभागृहात वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. दोन प्रकारच्या नोटांची छपाई कशी करण्यात आली? विशेषत: त्याचा आकार, डिझाइन आणि इतर वैशिष्ट्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटांना रद्द ठरवण्यामागील सरकारचा नेमका उद्देश काय हे समोर यायला हवे. वेगवेगळ्या आकारातील नोटांची छपाई केल्यामुळे चलनात पारदर्शकता येते का ? विश्वासार्हता वाढते का ? या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान, अर्थमंत्री, आरबीआयचे गव्हर्नर यांनी दिली पाहिजेत. त्यावर भूमिकेचे स्पष्टीकरण होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू ठेवले जाऊ शकत नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या इतर सदस्यांनीही घेतली होती.

नोटबंदीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयावर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कारण सरकारला आपल्या उपाय योजनेतून काळा पैसा, भ्रष्टाचार, समांतर चलना सारखे गैरप्रकार, दहशतवादाच्या समस्येला रोखण्यात अजिबात यश मिळाले नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. तत्पूर्वी राज्यसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले होते. परंतु गोंधळ वाढल्याने दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.

राहुल यांनी वारंवार सुरक्षा बाजूला ठेवून जोखीम घेतली : राजनाथ : राहुल गांधी यांच्यावरील दगडफेकीच्या प्रश्नावर मंगळवारी लोकसभेत सरकारने भूमिका मांडली. राहुल यांनी किमान १०० वेळा आपली सुरक्षा बाजूला ठेवून जोखीम घेतली. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल यांनी आपला जीव धोक्यात घातला होता, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गेल्या आठवड्यातील हल्ल्याच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्याशिवाय राहुल परदेशात जातात. परंतु त्याची माहिती मात्र एसपीजीला दौरा तोंडावर आल्यानंतर देतात. 

शरद यादवांचा पाठिंबा
राज्यसभेत काँग्रेस नेत्यांनी शून्य प्रहरी नोटांचा मुद्दा उपस्थित करताना नोटांचे फलक घेऊन झळकावले. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांत तृणमूलचे डेरेक आेब्रियन आणि जदयूचे नेते शरद यादव यांचाही समावेश होता. काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करून वेलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला होता. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी काँग्रेसला हा मुद्दा उपस्थित करण्याची पद्धत चुकल्याचे बजावले. 
बातम्या आणखी आहेत...