आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Decision On Telangana Soon, Hyderabad May Be Made Union Territory

हैदराबादला करणार केंद्रशासित प्रदेश, तेलंगणाच्‍या मुद्यावर कॉंग्रेसचा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला काँग्रेसच्या कोअर ग्रुपने अनुकूलता दर्शवली असली तरी या निर्णयाला आता पक्षाचे काही मंत्री व खासदारांनीच विरोध सुरू केला आहे. त्यांनी शनिवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेऊन विरोध दर्शवला. दरम्यान, काँग्रेस खासदार राजगोपाल यांनी सहकारी खासदारांनी संसदेत जोरदार विरोध करावा, असे आवाहन केले आहे.

आंध्र प्रदेश तसेच रायलसीमा भागातील बहुतांश खासदारांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. केंद्रीय मंत्री एम. एम. पल्लम राजू, के. एस. राव, चिरंजीवी, डी. पुरंदेश्वरी यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन तेलंगणा निर्मितीला विरोध केला. आंध्रचे विभाजन या भागाच्या विकासाच्या तसेच देशहिताच्या दृष्टीने हितावह नसल्याची भूमिका या सर्वांनी मांडली. बी. पी. राजू यांनी सांगितले, ‘तेलंगणा राज्याची निर्मिती केली तर अन्य छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी मागण्या जोर धरतील आणि नवी समस्या निर्माण होईल.


काँग्रेस हायकमांडविरोधी भूमिका घेत खासदार एल. राजगोपाल यांनी आपल्या सहकारी खासदारांनी स्वतंत्र तेलंगणानिर्मितीला विरोध करण्याचे आवाहन केले. आमदारांनीही हीच भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. उलट विधानसभेत तेलंगणाविरोधी आमदारांची शक्ती कमी होईल. त्यामुळे राजीनाम्याऐवजी आंदोलन करणेच उचित ठरेल, असे राजगोपाल यांनी नमूद केले.

काय आहे प्रकरण?
आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्य स्थापन करावे, अशी या भागातील लोकांची जुनी मागणी आहे. हा विषय राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील झाल्यावर काँग्रेस नेतृत्वाने यावर गांभीर्याने विचार सुरू केला. शुक्रवारी काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. यात वेगळ्या तेलंगणावर सर्वांचे एकमत झाले. कोअर ग्रुपमध्ये विचारविनिमय झाल्यानंतर आता निर्णयाची वाट आहे, असे दिग्विजयसिंह यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले होते. विशेष म्हणजे हैदराबाद ही आंध्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची पाच वर्षे राजधानी राहील व संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनातच याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेतही पक्षसूत्रांनी दिले होते.


राजकीय गणिते
आंध्र प्रदेश व तेलंगणा अशी दोन राज्ये गृहीत धरली तर दोन्ही राज्यांत प्रत्येकी 21 याप्रमाणे लोकसभेच्या 42 जागांवर काँग्रेसचा डोळा आहे. या निर्णयामुळे तेलंगणात काँग्रेसच्या बाजूने मते वळू शकतात. उर्वरित जागांसाठी जगनमोहन रेड्डी यांच्याशी युती करून विरोधकांचा सफाया करता येईल, असा काँग्रेस नेतृत्वाचा होरा आहे.