आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने पुन्हा मुंबईकरांची दैना, राज्यात अतिवृष्टीचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिनाभरात दुसर्‍यांंदा अरबी समुद्रात ‘कमी दाबा’चा पट्टा निर्माण झाला असून तो हळूहळू किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचे ‘तीव्र कमी दाबा’च्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र व गुजरातेत सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पोरबंदरच्या नैऋत्येला २८० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हळूहळू पूर्व आणि ईशान्येकडे सरकत चालला आहे. येत्या २४ तासांत त्याचे ‘तीव्र कमी दाबा’च्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५५ वेगाने वारे वाहत असून त्याचा वेग ताशी ६५ किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर राज्याच्या विविध भागात सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्याने रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी दादर रेल्वेस्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने चाकरमान्यांना भर पावसात बेस्टच्या बसकडे धाव घ्यावी लागली.

मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम
- कमी दाबाचा पट्टा हा चक्रीवादळाचा प्रारंभ व शेवटचा टप्पा असतो, असे हवामानतज्ज्ञ सांगतात; परंतु अशा सर्वच पट्ट्यांमुळे चक्रीवादळे येत नाहीत.
- असे असले तरी या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- अशा प्रकारच्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होतो. त्यामुळे हवामान खाते त्यावर बारीक नजर ठेवून आहे.