आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक न‍िकाल: पराभवाने शीला दीक्षित यांचा राजकीय अस्त?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीच्या तख्तावर सलग 15 वर्षे मुख्यमंत्रिपदी अढळ राहिलेल्या शीला दीक्षित यांना या निवडणुकीत धक्कादायक पराभव सहन करावा लागला आहे. 2013 च्या सरत्या वर्षाने शीला दीक्षितांचे राजकीय स्थानच धोक्यात असल्याचा इशारा दिला आहे. आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी 75 वर्षांच्या शीला दीक्षितांना सत्तेतून बाहेर पडण्यास भाग पाडले आहे.
शीला दीक्षित या काँग्रेस पक्षातील एक अत्यंत मेहनती आणि यशस्वी राजकारणी व्यक्ती आहेत. दिल्लीतील निवडणूक प्रचाराची धुरा एकटीने पेलत त्यांनी संपूर्ण दिल्ली शहरात जोरदार सभा घेतल्या होत्या. मात्र काँग्रेस पक्षाच्या केंद्रात आणि एकूणच देशभरात मलिन झालेल्या प्रतिमेचा जबरदस्त फटका शीला दीक्षितांना बसला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दिल्लीत सत्तेवर असताना त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत वीजनिर्मिती, ई-गव्हर्नन्स, विविध सामाजिक सुरक्षाविषयक योजना, अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये विकास घडवून आणला. राष्ट्रकुल स्पर्धांपूर्वी ढिसाळ आयोजनामुळे त्यांना अनेक आरोपांचा सामना करावा लागला. मेट्रो रेल्वेसारख्या परिवहन सुविधांसह अनेक विकास कामांचे श्रेय शीला सरकारला जाते. ‘भागीदारी’ ही संकल्पना राबवत त्यांनी सरकारी निर्णयप्रक्रियेत जनतेला प्रत्यक्ष सहभागी करून घेतले. परंतु वाढती महागाई, निवडणुकींच्या तोंडावर भाज्यांचे गगनाला भिडलेले दर, काँग्रेसची मलिन झालेली प्रतिमा यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेत जनतेतून पुढे आलेल्या आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांपुढे त्या टिकू शकल्या नाहीत.