आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील संरक्षण तळांचा आढावा, पठाणकोटच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धोक्याची शक्यता असलेल्या देशातील सर्व संवेदनशील संरक्षण तळांच्या सुरक्षेच्या पातळीवर आढावा घेतला जाईल. एका समितीद्वारे हा आढावा घेण्यात येईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी जाहीर केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

सुरक्षेच्या पातळीवर काही त्रुटी राहून गेल्या अाहेत का, याचा अहवाल घेऊन त्याचा तपशील देण्यात यावा, अशा सूचना सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सरकारने याबाबत एक समिती स्थापन करण्याचे ठरवले आहे. त्याबाबतची अधिसूचना दोन-चार दिवसांत जारी होईल. ही समिती लवकरच अशा ठिकाणांना भेट देऊन त्याची सविस्तर माहिती संकलित करेल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. समितीविषयी सविस्तर बोलण्यास मात्र नकार दिला. ही टीम विविध हवाई तळांना आठवडाभरात भेट देऊ शकते. गुरुवारी एनसीसीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कच्चे दुवे शोधणार
पठाणकोटमधील हवाई तळावर हल्ला होता म्हणून ही खबरदारी घेण्यात येत नसून देशातील सर्व संरक्षण तळांचा हा प्रश्न आहे. म्हणूनच संरक्षण अधिकारी तसेच स्थानिक कमांडरला सुरक्षेचा अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यातून सुरक्षा तळांचे कच्चे दुवे शोधून काढले जातील.
अडथळा नसेल
केंद्राने सुरक्षेच्या दृष्टीने सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे राष्ट्रीय तपास संस्थेला त्यांच्या तपासात कोणताही अडथळा येणार नाही. एनआयए पठाणकोटचा तपास करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच सरकार आपले विश्लेषण मांडेल, असे पर्रीकर म्हणाले.
संयम संपलाचा अर्थ समजून घ्या
आमचा संयम संपला, या विधानाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढण्यात आला. कारण मला तसे म्हणायचे नव्हते. संयम संपला म्हणजे तत्काळ प्रतिक्रिया देणे असे नव्हे. त्याचा अर्थ सकारात्मकदृष्ट्या आम्ही आमची ताकद वाढवणार आहोत. ती कशाप्रकारे वाढवली जाईल. त्याची रणनीती कशी असेल, हे जाहीरपणे सांगता येत नाही.
‘तेजस’चे कौतुक
भारताच्या कमी वजनाचे लढाऊ विमान तेजसचे कौतुक होत आहे. अनेक देशांनी त्यात रस दाखवला आहे. बहरिनमध्ये एअर शो होणार असून त्यात तेजसचे सादरीकरण केले जाणार आहे. भारताच्या सहभागामुळे पाकिस्तानने आपल्या जेएफ-१७ विमानाचे सादरीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, चीन यांच्या संयुक्त प्रयत्नातून जेएफ हे लढाऊ विमान तयार करण्यात आले.
एनसीसीला बळकट करण्याचे उद्दिष्ट
देशातील एनसीसीची संख्या १५ लाखांहून ३० लाखांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी निवृत्त लष्करी जवानांची उपलब्धता करून दिली जाईल. एनसीसीची ताकद वाढवणे महत्त्वाचे आहे. इयत्ता आठवी किंवा नववीपासून एनसीसीची सुरुवात केली जाऊ शकते. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.