आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Defence Research Orgnisation Made Special Chilly Spray For Woman Security

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांच्या सुरक्षेसाठी राष्‍ट्रीय संरक्षण सं‍स्थेने बनवला विशेष मिरचीचा स्प्रे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खाद्यपदार्थांना चव आणणारी, मात्र प्रमाण बिघडले की ब्रह्मांड आठवून देणारी मिरची आता अडचणीत सापडलेल्या महिलांचे संरक्षण करणार आहे. महिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षण व संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) विशेष स्प्रेची निर्मिती केली आहे.

आसाममध्ये लागवड केल्या जाणार्‍या जगातील सर्वांत तिखट मिरचीचा या स्प्रेसाठी वापर करण्यात आल्याची माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली. महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे का, असा प्रश्न संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांना विचारण्यात आला होता.


अशी आहे भूत जोलोकिया
आसाम व ईशान्य राज्यांत लागवड केली जाणारी भूत जोलोकिया ही जगातील सर्वांत तिखट मिरची आहे. सामान्य मिरचीपेक्षा तिचा तिखटपणा हजारपटींनी अधिक आहे. 2007 मध्ये गिनीज बुकात या मिरचीची नोंद आहे.


बाजारात केव्हा :
स्प्रेचा पहिला नमुना तयार असून गरज भासल्यास विषशास्त्राच्या कसोट्यांवर तो तपासून पाहिला जाईल. चाचण्यांनंतर स्प्रे लोकांपर्यंत जावा यासाठी डीआरडीओ आवश्यक ती पावले उचलेल, अशी माहिती अँटनी यांनी दिली.
असा आहे स्प्रे : डीआरडीओच्या तेजपूरच्या प्रयोगशाळेत ‘कॅप्सिस्प्रे’ या स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी बिनविषारी मात्र तात्पुरते अंधत्व आणणार्‍या या स्प्रेचा वापर करता येईल. भूत जोलोकिया मिरचीतील ‘ओलियोरेसिन कॅप्सिकम’ या अर्काचा वापर ‘कॅप्सिस्प्रे’मध्ये करण्यात आला आहे.


जहालपणा उपयोगी : भूत जोलोकिया मिरचीचा जहालपणा डीआरडीओला इतका भावला की, संस्थेच्या वैज्ञानिकांनी या मिरचीपासून हातगोळ्यांची निर्मिती करण्याचे सूतोवाच 2009 मध्ये केले. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी तसेच अतिरेक्यांना अड्डय़ाबाहेर येण्यास भाग पाडण्यासाठी या हातगोळ्यांचा वापर होईल. याच वेळी ‘कॅप्सिस्प्रे’चीही निर्मिती सुरू करण्यात आली होती.